![]()
नांदर येथील जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात पित्यानेच दोन मुलांना फेकल्याची घटना घडली होती. यातील मोठा मुलगा आरुष याचा मृतदेह बुधवारी सापडला. तर ६ वर्षीय शाम रोडगे याचा मृतदेह ६३ तासांच्या शोधमोहिमेनंतर गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास नवगाव १० नंबर चारीच्या कालव्यात आढळून आला. त्याच्यावर नांदर येथील स्मशानभूमीत सायंकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, आरोपी पित्यास पैठण न्यायालयात हजर केले असता, त्यास सोमवार, २३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. नांदर शिवारात सोमवारी रात्री आरुष रोडगे (८) व शाम रोडगे (६) ही दोन चिमुकली भावंडे वडिलांना कालव्यात वाहून गेल्याची घटना घडली होती. नागरिक, नातेवाईक व पोलिसांच्या शोधमोहिमेत बुधवारी सकाळी आरुषचा मृतदेह सापडला; मात्र श्यामचा शोध सुरूच होता. गुरुवारी सकाळी शेतकऱ्यांना टाकळी अंबड शिवारातील कालव्यात मृतदेह दिसला. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पाचोड पोलिसांना माहिती दिली. सहायक पोलिस निरीक्षक सचिन पंडित व विहामांडवा पोलिस चौकीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पाचोड ग्रामीण रुग्णालयात डॉ. शेख मसरत यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलांना कालव्यात ढकलले गेले का? की कौटुंबिक वादातून हे पाऊल उचलले गेले? या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. पोटच्या गोळ्यांचा जीव घेण्याइतपत टोकाची भूमिका वडिलांनी का घेतली, यामागील कौटुंबिक कलह, व्यसन किंवा आर्थिक विवंचना हे घटक महत्त्वाचे ठरणार आहेत.
Source link
63 तासांच्या शोधानंतर दुसऱ्या चिमुकल्याचा मृतदेह सापडला:नांदर येथील पित्यास 23 नोव्हेंबरपर्यंत कोठडी