![]()
मोर्शी पोलिसांनी ४.८० लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करत अमरावती येथील दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही अंमली पदार्थांचे जाळे पसरल्याचे स्पष्ट झाले आहे. ही कारवाई बुधवारी मध्यरात्री चांदूरबाजार रोडवरील स्मशानभूमीसमोरील रेल्वे गेटजवळ करण्यात आली. पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, दोन व्यक्ती एका चारचाकी वाहनातून एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थ घेऊन जाणार आहेत. अमरावती ग्रामीणचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार, मोर्शीचे ठाणेदार राहुल आठवले यांनी त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकासह ही कारवाई केली. पोलिसांनी सापळा रचून पांढऱ्या रंगाच्या टाटा झेस्ट गाडीला थांबवले. गाडीतील अब्दुल हफिज अब्दुल मजीद (वय ३९, रा. बिसमिल्लाह नगर, लालखडी, अमरावती) आणि अकिल अहेमद जमील अहेमद (वय ३२, रा. रेहमतनगर, लालखडी, अमरावती) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे ५ ग्रॅम एमडी (अंदाजे किंमत ५० हजार रुपये), दोन अँड्रॉइड मोबाईल (अंदाजे किंमत ३० हजार रुपये) आणि टाटा झेस्ट गाडी (अंदाजे किंमत ४ लाख रुपये) असा एकूण ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींनी एमडी ड्रग्ज कोठून आणले याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मध्यरात्री २.३० वाजता करण्यात आली, त्यावेळी तहसीलदार सागर ढवळे, दोन शासकीय पंच आणि एफएसएल फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी उपस्थित होते.
Source link
मोर्शीत एमडी ड्रग्ज जप्त, अमरावतीचे दोघे अटकेत:पोलिसांनी 4.80 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला, स्मशानभूमीजवळ कारवाई