Headlines

बनेश्वरच्या जंगलात दुर्मिळ ‘स्वर्ग नर्तका’चे दर्शन:शहरीकरणामुळे अधिवासावर संकट, पक्षीप्रेमींकडून चिंता व्यक्त




पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील प्रसिद्ध बनेश्वर देवस्थानच्या जंगल परिसरात अत्यंत दुर्मिळ ‘स्वर्ग नर्तक’ (एशियन पॅराडाइज फ्लायकॅचर) या पक्ष्याचे दर्शन झाले आहे. या देखण्या पक्ष्याच्या दर्शनामुळे वन्यजीव अभ्यासक आणि पक्षीप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. पुणे जिल्हा वन्य प्राणी व सर्प रक्षक असोसिएशनचे अध्यक्ष सुशील विभुते आणि विशाल शिंदे हे या परिसरात एका मोहिमेवर असताना त्यांना हा पक्षी प्रथमच दिसला. हवेत लहरणारी रिबनसारखी लांबसडक शेपटी आणि डौलदार उड्डाण यामुळे या पक्ष्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘स्वर्ग नर्तक’ या नावाने ओळखला जाणारा हा पक्षी हिंदीमध्ये ‘दूधराज’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. या पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची शेपटी शरीराच्या लांबीपेक्षा जास्त, म्हणजे तब्बल 30 सेंटीमीटरपर्यंत लांब असू शकते. प्रौढ नर पक्षी पांढऱ्या रंगात आढळतो, तर मादी किंवा तरुण पक्षी प्रामुख्याने तपकिरी रंगाचे असतात. हा पक्षी प्रामुख्याने घनदाट जंगले, बांबूची बेटे आणि पाण्याच्या जवळील शांत भागात राहणे पसंत करतो. कीटकभक्षी असलेला हा पक्षी हवेत उडतानाच अत्यंत चपळाईने कीटक पकडतो. मे ते जुलै हा या पक्ष्यांचा प्रजनन काळ असतो, ज्या काळात त्यांचे दर्शन होणे जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. मात्र, या दुर्मिळ पक्ष्याच्या अधिवासावर आता शहरीकरणाचे सावट येत असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. झाडांची मोठ्या प्रमाणावर होणारी तोड आणि देशी झाडांच्या जागी लावली जाणारी विदेशी शोभेची झाडे यामुळे या पक्ष्यांचा नैसर्गिक निवारा नष्ट होत आहे. सुशील विभुते यांच्या मते, नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास या पक्ष्यांसाठी धोकादायक आहे. ज्येष्ठ सर्प तज्ज्ञ अनिल कानसकर यांनीही स्थानिक जैवविविधता टिकवण्यासाठी देशी वृक्षांच्या संवर्धनाची गरज अधोरेखित केली आहे.

बनेश्वर परिसरात या पक्ष्याची झालेली ही पहिलीच नोंद असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मध्य प्रदेशचा ‘राज्य पक्षी’ असलेल्या या स्वर्ग नर्तकाचे दर्शन होणे ही निसर्ग संवर्धनासाठी आनंदाची बाब आहे. हा अनमोल ठेवा जपण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी जंगल व वृक्षांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *