Headlines

हिंगोली राज्य राखीव दलाच्या समादेशकपदी स्वाती भोर यांची नियुक्ती:5 महिन्यांपासून रिक्त असलेले पद अखेर भरले




हिंगोलीच्या राज्य राखीव दलाच्या समादेशकपदी छत्रपती संभाजीनगर येथील लोहमार्गच्या पोलिस अधिक्षक स्वाती भोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बाबतचे आदेश राज्याच्या गृह विभागाने शुक्रवारी ता. १५ काढले आहेत. हिंगोली येथील राज्य राखी दलाचे समादेशक पद मागील सुमारे पाच महिन्यापासून रिक्त होते. तत्कालीन समादेशक पोर्णिमा गायकवाड यांच्या बदली नंतर हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर हिंगोलीच्या समादेशक पदाचा पदभार छत्रपती संभाजी नगर येथील राखीव दलाचे समादेशक विक्रम साळवी यांच्याकडे काही दिवस सोपविण्यात आला होता. तर काही दिवस येथील पदभार जालना येथील राज्य राखीव दलाच्या समादेशक उज्वला बनकर यांच्याकडे देखील सोपविण्यात आला होता. मात्र कायमस्वरूपी समादेशक नसल्यामुळे मोठी अडचण होऊ लागली होती. राखीव दलातील वसाहती मधील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासोबतच जवानांचे कार्यालयीन कामे प्रलंबित राहात होती. दरम्यान शासनाच्या गृह विभागाने आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. यामध्ये हिंगोलीच्या राज्य राखीव दलाच्या समादेशकपदी छत्रपती संभाजीनगर येथील लोहमार्ग विभागाच्या पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांची नियुक्ती केली आहे. मागील सुमारे पाच महिन्यापासून रिक्त असलेले पद भरण्यात आल्यामुळे आता राज्य राखीव दलाच्या गटातील महत्वाचे प्रश्न तसेच जवानांच्या कार्यालय कामकाजाचे प्रश्न मार्गी लागणार आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी यापूर्वी संगमनेर येथे पोलीस उपाधीक्षक म्हणून तर त्यानंतर श्रीरामपूर येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले. अत्यंत कडक शिस्तीच्या अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे हिंगोलीच्या राज्य राखीव दलाला नवे बळ मिळणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *