Headlines

नीट पेपरफुटीच्या चौकशीचा आवाका वाढणार:नाशिक येथील बडे क्लासचालक CBI च्या रडारवर; पेपरफुटीत 'टेलिग्राम'चा प्रभावी वापर




नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने शुभम खैरनार नामक तरुणाला अटक केली आहे. त्यानंतर आता येथील अनेक मोठे मासे सीबीआयच्या रडारवर आलेत. यात शहरातील काही प्रतिष्ठित क्लासचालकांचाही समावेश आहे. शुभमनंतर या सर्वांची सीबीआयकडून चौकशी होणार असल्याची माहिती असल्यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. देशात गत 3 मे रोजी वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली नीट परीक्षा झाली होती. पण पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आता ही परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार, 21 जून रोजी होईल. या परीक्षेसाठी कोणतेही शुल्कही आकारण्यात येणार नाही. नीट पेपरफुटीचा तपास करणाऱ्या सीबीआयने या प्रकरणात आतापर्यंत 9 जणांना अटक केली आहे. यात नाशिकच्या शुभम खैरनार, अहिल्यानगरचा धनंजय लोखंडे, लातूरचा पी. व्ही. कुलकर्णी व पुण्यातील मनीषा वाघमारे व प्राध्यापिका मनीषा मांढरे यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर सीबीआयने आता नाशिक येथील खासगी कोचिंग क्लास चालकांकडे आपला मोर्चा वळवल्याची माहिती पुढे आली आहे. नाशिक येथील कोचिंग क्लासेस रडारवर यासंबंधीच्या माहितीनुसार, प्रस्तुत प्रकरणात सीबीआयएचे एक विशेष पथक सध्या अत्यंत गोपनीयपणे या प्रकरणातील बारकावे तपासत आहे. पेपरफुटी प्रक्रियेत टेलिग्रामचा सर्वाधिक वापर करण्यात आला. त्यामुळे सीबीआय डिजिटल पुराव्यांच्या आधारावर पुढील तपास करत आहे. विशेषतः या प्रकरणी शुभम खैरनार राहत असलेल्या व त्याच्या कार्यालयाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व कॉल डिटेल्स सीबीआयकडून खंगाळले जात आहेत. गत काही महिन्यांत शुभमच्या संपर्कात कोण-कोण आले? त्याने कुणाशी फोन किंवा सोशल मीडियावरून संपर्क साधला, तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांनी कुणाशी संपर्क साधला या सर्वांचा यासंबंधी धुंडाळा घेतला जात आहे. सध्या शुभमच्या अटकेनंतर त्याच्या जवळच्या मित्रांची व इतर संबंधितांची चौकशी व जबाब नोंदणी केली जात आहे. प्राथमिक चौकशीत शुभमने यापूर्वी काही विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवून दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नाशिक येथील काही प्रसिद्ध कोचिंग क्लासेसचे संचालकही आता सीबीआय चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. या चौकशीत आणखी काही मोठे पुरावे व इतर संशयितांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. पी व्ही कुलकर्णी संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड सीबीआयने नीट पेपरफुटी प्रकरणात एनटीएच्या परीक्षा प्रक्रियेत सहभागी असणारा केमिस्ट्री अर्थात रसायनशास्त्राचा माजी प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी याला अटक केली आहे. कुलकर्णी याला थेट प्रश्नपत्रिकांपर्यंत प्रवेश होता. त्यामुळे त्यानेच एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आपल्या नेटवर्कद्वारे प्रश्नपत्रिका लीक केल्याचा आरोप आहे. कुलकर्णी हा पुण्यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारेच्या संपर्कात आला होता. त्यामुळे तिलाही या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. मनीषा मांढरेंवर होणार शिस्तभंगाची कारवाई नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयकडून प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना शनिवारी अटक करण्यात आली. त्यानंतर त्या कार्यरत असणाऱ्या मॉडर्न कॉलेज प्रशासनाने त्यांच्या विरोधात चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या या महाविद्यालयात गत 24 वर्षांपासून कार्यरत आहेत. त्या 2002 पासून अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना वनस्पतीशास्त्र हा विषय शिकवत होत्या. महाविद्यालयाच्या निवेदनानुसार, खासगी शाळेतील कर्मचारी नियमावली 1881 मधील तरतुदीनुसार मनीषा मांढरे यांच्याविरोधात चौकशी प्रक्रिया राबवली जाईल. याशिवाय त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईही करण्यात येईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *