![]()
मध्य पूर्वेत वाढलेल्या अमेरिका-इराण तणावाचा परिणाम आता भारतीय व्यापारावरही स्पष्टपणे दिसू लागला आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक उद्योग अडचणीत आले असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कुटुंबाच्या व्यवसायालाही मोठा फटका बसल्याची माहिती स्वतः गडकरी यांनी दिली. नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्या कुटुंबाच्या उद्योगासमोरील अडचणी उघडपणे मांडल्या. युद्धामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आणि शेकडो कंटेनर मार्गातच अडकून राहिल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागल्याचे त्यांनी सांगितले. नितीन गडकरी यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबाचा डिटर्जेंट उत्पादनाचा व्यवसाय आहे. साखरेपासून तयार होणाऱ्या या उत्पादनाची जबाबदारी त्यांच्या सुनेकडे आहे. दर महिन्याला जवळपास शंभर कंटेनर अमेरिकेत पाठवले जात होते. मात्र, मध्य पूर्वेत तणाव वाढल्यानंतर आंतरराष्ट्रीय वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आणि कंटेनरची हालचाल थांबली. त्यामुळे संपूर्ण व्यवसायाला मोठा धक्का बसला. पूर्ण धंदाच बसला होता, असे स्पष्ट शब्दांत गडकरी म्हणाले. मात्र, या संकटातही हार न मानता स्थानिक बाजारपेठेत माल विक्री सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर गडकरी यांच्या मुलाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारालाही या परिस्थितीचा गंभीर फटका बसला. भारतातून इराणला मोठ्या प्रमाणात केळी निर्यात केली जात होती, तर इराणहून सफरचंद भारतात आणले जात होते. युद्ध सुरू झाल्यानंतर हा पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला. केळ्यांनी भरलेले सुमारे 400 कंटेनर मार्गातच अडकून पडले आणि त्यातील माल खराब झाला. तसेच इराणमधून येणाऱ्या सुमारे 200 कंटेनरमधील सफरचंदांचेदेखील मोठे नुकसान झाले. या संपूर्ण प्रकारामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे गडकरी यांनी सांगितले. या प्रसंगी त्यांनी विमा कंपन्यांवरही नाराजी व्यक्त केली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही विमा रक्कम मिळवताना अनेक अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. विमा कंपन्या दाव्यांच्या प्रक्रियेत विलंब करत असल्यामुळे व्यापाऱ्यांचे संकट आणखी वाढत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. युद्ध, वाहतूक अडथळे आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे उद्योग क्षेत्र मोठ्या दबावाखाली असल्याचेही त्यांनी नमूद केले. नव्या पद्धतीने बाजारपेठ शोधून व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न व्यवसायातील चढ-उतार हा उद्योग क्षेत्राचा एक भाग असल्याचे सांगत नितीन गडकरी यांनी उद्योजकांना सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला. अडचणी आल्या म्हणून घाबरून न जाता परिस्थितीनुसार मार्ग शोधणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. संघर्षाशिवाय व्यवसायात यश मिळत नाही, असे सांगत त्यांनी आत्मनिर्भरता आणि सकारात्मक विचार यावर भर दिला. मोठ्या नुकसानानंतरही नव्या पद्धतीने बाजारपेठ शोधून व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला, असे सांगत त्यांनी उद्योग क्षेत्राला धैर्याने पुढे जाण्याचा संदेश दिला.
Source link
गडकरींचा कुटुंबाच्या व्यवसायातील संकटावर मोठा खुलासा:इराण युद्धाचा फटका; शेकडो कंटेनर अडकले, कोट्यवधींचं नुकसान