![]()
पुणे महापालिकेकडून यावर्षीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे यंदाचा जयंती उत्सव संस्मरणीय ठरेल, अशी ग्वाही उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी दिली. त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. जयंती उत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आंबेडकर पुतळा येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमहापौर वाडेकर यांच्यासह स्थानिक नगरसेवक नीलेश आल्हाट, मनपा उपायुक्त परिमंडळ १ माधव जगताप, उपअभियंता बाळासाहेब पंडित, विठ्ठल गायकवाड आणि राहुल डंबाळे उपस्थित होते. महापालिका यावर्षी प्रथमच अनेक नवीन सुविधा उपलब्ध करून देणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचा आंबेडकर पुतळा, मंगळवार पेठेतील आंबेडकर भवन आणि कॅम्प परिसरातील आंबेडकर पुतळा या संपूर्ण मार्गावर मंडपाचे आच्छादन घालण्यात येणार असल्याची माहिती उपमहापौर वाडेकर यांनी दिली. आंबेडकरी चळवळीच्या विचारांचा प्रसार करणारी पुस्तके नागरिकांना पाहता यावीत आणि विकत घेता यावीत यासाठी फोटोझिंकोच्या गल्लीत पुस्तकांच्या स्टॉल्ससाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाईल. तसेच, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या सूचनेनुसार जयंती उत्सव काळात संपूर्ण परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार असल्याचेही वाडेकर यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी ज्या ठिकाणी उत्सव साजरा केला जाईल, तेथे रात्री बारा वाजेपर्यंत महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहतील. तेथील सुविधा आणि स्वच्छतेचे नियोजन त्यांच्याकडून केले जाईल. पोलिसांच्या सहकार्याने काही मार्गांमध्ये बदल करून वाहतुकीचे योग्य नियोजन केले जाईल, अशी माहिती उपायुक्त जगताप यांनी दिली. उत्सवाच्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा आणि अग्निशामक दलही तैनात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपमहापौर वाडेकर यांनी कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. आंबेडकर जयंती किंवा अन्य कोणत्याही महापुरुषांच्या उत्सवावेळी वेळेच्या किंवा आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली आहे. याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास वाडेकर यांनी व्यक्त केला. शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांची योग्य देखभाल होत नसल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची आठवड्यातून एकदा स्वच्छता करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिल्याचेही उपमहापौर वाडेकर यांनी सांगितले.
Source link
पुणे महापालिका डॉ. आंबेडकर जयंतीसाठी देणार अद्ययावत सुविधा:उपमहापौर वाडेकर म्हणाले – यंदाचा उत्सव संस्मरणीय ठरेल