![]()
नाशिकमधील बहुचर्चित आयटी हब आणि अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत वाढ झाली आहे. खरातला आज नाशिक सत्र न्यायालयाने तिसऱ्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यापूर्वीच्या दुसऱ्या गुन्ह्यातील 7 दिवसांची कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायाधीश बी. एन. इचपुराणी यांच्या न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात खरातच्या कार्यपद्धतीचा पर्दाफाश केला. आरोपी लोकांना नकली साप आणि वाघाची भीती दाखवून लुटत होता. मंतरलेले खडे आणि चिंचोके विकून त्याने अनेकांची फसवणूक केली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, महिलांना वश करण्यासाठी तो त्यांना विशिष्ट प्रकारचे द्रव्य किंवा पेढे खाऊ घालत असे. या पदार्थांमध्ये नक्की काय मिसळले जात होते आणि ते कुठून आणले जात होते, याचा तपास करणे आवश्यक आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. सरकारी वकिलांचा युक्तिवाद: आरोपी सहकार्य करत नाही! सरकारी वकिलांनी 7 दिवसांच्या कोठडीची मागणी करताना सांगितले की, आरोपी अत्यंत हुशार असून तो तपासात सहकार्य करत नाही. त्याच्याकडून जप्त केलेला पेनड्राईव्ह आणि लॅपटॉप यातील माहितीच्या आधारे त्याची समोरासमोर चौकशी करायची आहे. तसेच, नकली खडे पुरवणाऱ्या महेश कलंत्री याच्याशी असलेल्या संबंधांचा आणि गुन्ह्यात वापरलेल्या साहित्याचा शोध घेणे बाकी असल्याचे वकिलांनी नमूद केले. बचाव पक्षाचा विरोध आरोपीचे वकील सचिन भाटे यांनी पोलीस कोठडीला जोरदार विरोध केला. या प्रकरणाचा तपास आधीच एसआयटी (SIT) करत आहे. नकली साप, नाग आणि खड्यांचे विषय यापूर्वीच्या तपासातही आले होते. एकाच विषयावर वारंवार कोठडीची गरज काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच गुन्ह्याचा कालावधी आणि पेनड्राईव्हच्या जप्तीवरही त्यांनी शंका उपस्थित केली. न्यायालयाचा निकाल दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, गुन्ह्याचे गांभीर्य आणि तपासातील अपूर्ण दुवे लक्षात घेता न्यायालयाने अशोक खरातला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या काळात त्याच्याकडून ‘आयटी जिहाद’ आणि महिलांवरील अत्याचाराच्या संदर्भात आणखी कोणते धागेदोरे हाती लागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Source link
भोंदूबाबा अशोक खरातला तिसऱ्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलिस कोठडी:नाशिक न्यायालयाचा निर्णय, नकली साप, नशिल्या पेढ्यांचे रहस्य उलगडणार