![]()
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील इंधन टंचाईचा दाखला देत विधान परिषदेची निवडणूक लांबणीवर टाकण्याची मागणी केली आहे. सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. पुण्यात तर जमावबंदीचे आदेश लागू झालेत. अशा स्थितीत विधान परिषद निवडणूकी घेण्याची गरज आहे का? ही निवडणूक पुढे ढकललेलीच बरी, असे ते म्हणालेत. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांत जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यातच आजपासून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना आमदार रोहित पवार यांनी उपरोक्त मागणी केली आहे. आज राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंधन तुटवडा निर्माण झाला असून दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे, पुण्यात तर जमावबंदीचे देखील आदेश लागू झाले आहेत. अशा स्थितीत विधानपरिषद निवडणूक घेण्याची गरज आहे का ? यावर विचार होणं गरजेचं आहे. असंही घोडेबाजार करूनच ह्या निवडणुका होणार आहेत. रिसॉर्ट, पर्यटन, मतदारांचा घोडेबाजार यावर शेकडो कोटी खर्च होतील. त्यामुळे निवडणूक आयोगाने राज्यातील बिकट परिस्थिती लक्षात घेत या निवडणुका पुढे ढकलायला हव्यात. निवडणुका पुढे गेल्यास या बिकट स्थितीत सरकारला सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल, असे ते म्हणालेत. नगरसेवकांची सर्रास खरेदी – विक्री सुरू दुसरीकडे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत नगरसेवकांची सर्रास खरेदी-विक्री सुरू असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण पूर्णपणे उद्योगपतींच्या दावणीला बांधले गेले असून, नगरसेवकांची सर्रास खरेदी-विक्री सुरू आहे. काही नगरसेवकांना आपल्याकडे ओढण्यासाठी सुरुवातीला 5-5 लाख रुपये ॲडव्हान्स दिले गेले आणि आता हा ‘रेट’ थेट 15 लाख रुपयांवर गेला आहे! एका मतासाठी 15 लाख मोजणारा हा सत्ताधाऱ्यांचा सुळसुळाट लोकशाहीसाठी अत्यंत घातक आणि कलंकित करणारा आहे. या गलिच्छ फोडाफोडीला आणि दडपशाहीला काँग्रेस पक्ष भीक घालणार नाही. जे कोणी पक्षाचा व्हीप धुडकावून, पैशांच्या मोहापायी गद्दारी करतील, त्यांचे सदस्यत्व तात्काळ रद्द करण्याची कायदेशीर प्रक्रिया आम्ही सुरू करू. केवळ एवढेच नाही, तर पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना पुढील ६ वर्षांपर्यंत कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही. गद्दारी करणाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत राहूनच त्यांची जागा दाखवून दिली जाईल! काँग्रेस पक्ष तत्त्वांवर आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच या सर्व गद्दारीला चोख उत्तर देईल, असे ते म्हणालेत.
Source link
विधानपरिषद निवडणूक लांबणीवर टाका:आमदार रोहित पवार यांची मागणी; इंधन टंचाई अन् निवडणुकीतील घोडेबाजाराचा दिला दाखला