![]()
वसमत येथील शुक्रवारपेठ भागात बैलाचा धक्का लागणे व बैलाच्या पाठीवर हात मारणे या क्षुल्लक कारणावरून झालेला वाद दोन गटातील हाणामारीत झाला. यामध्ये पाच जण जखमी झाले असून त्यांना वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी परस्पर तक्रारीवरून 29 जणांवर शनिवारी ता. 30 पहाटे वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील भट्टीगल्ली भागातील रामा क्षिरसागर हे शुक्रवारी ता. 29 रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शुक्रवारपेठ भागातून बैल घेऊन जात होते. यावेळी त्यांनी त्या भागातील रस्त्यावरील नागरीकांना बैलाचा धक्का लागेल बाजूला सरका असे सांगितले. तर याचवेळी त्या ठिकाणी असलेल्या सय्यद आसेफ याने बैलाच्या पाठीवर थाप मारली. या कारणावरून दोघांमध्ये वादाला तोंड फुटले. दरम्यान, किरकोळ कारणावरून सुरु झालेल्या वादाचे पर्यावसाण हाणामारीत झाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दोन्ही गटातील नागरीक समोरा समोर आले. यावेळी शाब्दिक चकमकीनंतर हाणामारी सुरु झाली. लोखंडी रॉडने मारहाण तसेच विटा फेकून मारण्यात आल्या. यामध्ये एका टेम्पोचे कार फुटली तर एका किरणा दुकानाची तोडफोड झाल्याने सुमारे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले. या घनटेची माहिती मिळताच वसमत शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर डेडवाल, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार गजानन भोपे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या हाणामारीत जखमी झालेल्या पाच जणांना तातडीने उपचारासाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी रामा क्षिरसागर यांच्या तक्रारीवरून सय्यद नासेर, सय्यद आसेफ, सय्यद असद, शाहरूख पठाण, शेख साजीद यांच्यासह 19 जणांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर याच प्रकरणात सय्यद आसेफ यांनी दिलेल्या तक्रारीवरून रामा क्षिरसागर, सोनू क्षिरसागर, प्रभाकर क्षिरसागर, अवी गायकवाड, अमोल क्षिरसागर यांच्यासह 10 जणांवर गुुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर डेडवाल पुढील तपास करीत आहेत. सध्या वसमत शहरात शांतता असून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरीकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे.
Source link
वसमतमध्ये क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी:5 जण जखमी, परस्पर तक्रारीवरून 29 जणांवर गुन्हा दाखल