![]()
खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथे घृष्णेश्वर मंदिर परिसरात पार्किंगची व्यवस्था नसल्याने एका भाविकाच्या कारला ऊसाच्या वाळलेल्या पाचटामुळे आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गुजरात पासिंग असलेल्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. गुजरातमधील एक भाविकाने आपली (जीजे २६ एन १७३८) क्रमांकाची कार मंदिराजवळील मोकळ्या जागेत उभी होती. या ठिकाणी उसाच्या रसवंतीगृहातील वाळलेले पाचट मोठ्या प्रमाणात पडले होते. दुपारच्या सुमारास अज्ञात कारणाने पाचटाने पेट घेतला आणि आगीने जवळ उभ्या असलेल्या कारला घेरले. स्थानिक नागरिक व दुकानदारांनी तातडीने पाणी टाकून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत कारचा दर्शनी भाग, बंपर, डावा हेडलॅम्प व टायर पूर्णपणे जळून खाक झाले होते. घटनेच्या वेळी कारमध्ये कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मंदिर परिसरात अधिकृत पार्किंगची व्यवस्था अपुरी आहे. त्यामुळे भाविक रस्त्याच्या कडेला, दुकानांसमोर मिळेल त्या जागेत वाहने उभी करतात. कचरा, उसाचे पाचट व इतर ज्वलनशील पदार्थही या परिसरात पडून असतात. “आज सुदैवाने जीव वाचले, पण उद्या मोठा अपघात होऊ शकतो, अशी भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली. २१० कोटींच्या वेरूळ विकास आराखड्यात २ एकरवर नवीन पार्किंग प्रस्तावित आहे. मात्र तोपर्यंत तात्पुरती पार्किंग व्यवस्था करावी, परिसरातील कचरा व पाचट नियमित उचलावे, अशी मागणी भाविक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Source link
उसाचे पाचट पेटल्याने वेरूळमध्ये कारला आग:गुजरात येथील भाविकाच्या वाहनाचे नुकसान