Headlines

बनावट कामगार प्रमाणपत्रे देणारे रडारवर:नागपूर ग्रामीण पोलिसांकडून 2 ऑनलाईन केंद्रांवर छापे




नागपूर ग्रामीण पोलिसांनी बांधकाम कामगारांच्या सरकारी योजनांचा गैरफायदा घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बनावट प्रमाणपत्रांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. प्रत्यक्षात बांधकाम क्षेत्रात एकही दिवस काम न केलेल्या व्यक्तींना ‘९० दिवस काम केल्याचे’ खोटे दाखले देऊन शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नागपूर ग्रामीण जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगाराने बांधकाम क्षेत्रात किमान ९० दिवस काम केल्याचे अधिकृत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. ही प्रमाणपत्रे अधिकृत ठेकेदारांमार्फत दिली जातात. मात्र, काही ठेकेदार आणि ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी संगनमत करून काम न केलेल्या व्यक्तींना खोटी प्रमाणपत्रे तयार करून दिल्याचे उघड झाले. मंडळाच्या योजनांमध्ये गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारींनंतर अपर कामगार आयुक्त, नागपूर यांच्या निर्देशानुसार विशेष दक्षता पथके स्थापन करण्यात आली. या पथकांनी विविध ठिकाणी तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत शासनाची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. या मोहिमेदरम्यान, पहिली कारवाई बेला पोलिस स्टेशन अंतर्गत बाजार चौक येथील ‘आयांश ऑनलाईन सर्व्हिस सेंटर’वर करण्यात आली. पोलिसांनी बांधकाम कामगार नोंदणीसाठी वापरण्यात येणारी संशयास्पद कागदपत्रे जप्त केली. चौकशीअंती येथील प्रमाणपत्रे बनावट असल्याचे सिद्ध झाले. याप्रकरणी केंद्र चालक शुभम लोणारे (रा. धामणगाव, ता. समुद्रपूर, जि. वर्धा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दुसरी कारवाई कुही पोलिस स्टेशन अंतर्गत मांढळ येथील ‘भोयर इंटरनेट कॅफे’वर करण्यात आली. तपासणीत ठेकेदाराच्या सही आणि शिक्यासह असलेली कोरी व अपूर्ण बनावट प्रमाणपत्रे पोलिसांच्या हाती लागली. ही प्रमाणपत्रे बेकायदेशीर नोंदणी प्रक्रियेत वापरण्याच्या उद्देशाने तयार ठेवण्यात आली होती. याप्रकरणी कॅफे चालक प्रणय भोयर आणि ठेकेदार प्रजय विलास गजभिये (दोघे रा. मांढळ, ता. कुही, जि. नागपूर) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आर्थिक फायद्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करून शासनाची दिशाभूल आणि फसवणूक केल्याप्रकरणी ३० मे २०२६ रोजी या सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) आणि ३३६ (३) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागपूर ग्रामीण पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *