![]()
आदिला नदीवर स्वखर्चाने लहान पूल बांधण्याची बेकायदा परवानगी खुद्द महापालिकेनेच दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. इतकेच नव्हे, तर पुलाचे बांधकाम होईपर्यंत नदीचा प्रवाह वळवण्यासही सहमती दिली. त्यापोटी एका व्यक्तीकडून 3 लाख 19 हजार रुपयांचे देखरेख शुल्क आकारले. नदीपात्रात कोणत्याही बांधकामाला परवानगी देण्याचा अधिकार महापालिकेला नाही. आवश्यक असलेल्या बांधकामासाठी जलसंपदा विभागाची ‘ना-हरकत’ (एनओसी) हवी असते. परंतु या नियमांना बगल देऊन ‘अर्थपूर्ण’ व्यवहार झाल्याचे दिसून येते. नदीपात्रातील ‘स्वराज्य विहार’समोर हा पूल बांधण्यात आला आहे. त्याशिवाय गुलमोहर अपार्टमेंटच्या पाठीमागील रस्त्यावरही नदीच्या पात्रातच आणखीन एक लहान पूल बांधण्यात आला. तो कोणी बांधला? कधी बांधला? याच्या नोंदी महापालिकेकडे नाहीत. आयुक्तांनी हा पूल पाडण्याचा आदेश दिला होता. त्याला रहिवाश्यांनी विरोध केल्याने प्रकरण तूर्त थांबले आहे. जागा विकल्यानंतर झाला पुलाचा विषय आमची जागा दुसऱ्यांना विकली. त्यानंतरचा हा विषय पुढे आलेला आहे. ज्यांनी जागा विकत घेतली, त्यांनी माझ्याकडून पुलासंदर्भात सही घेतलेली होती. पुढे त्यांनी काय केले? याबाबत मला काहीही माहिती नाही. ज्यांनी जागा घेतली, त्यांनाच याबाबत विचारणे योग्य होईल. श्रवण भंवर, पुलासाठी परवानगी मिळवणारे पूर्वीचे जागा मालक एकावर आधीच गुन्हा, दुसऱ्याची चौकशी करून कारवाई या ठिकाणी बेकायदशीर पाइपलाइन टाकून पूल बांधल्याबद्दल श्रीमंत जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. राहुल नगरमध्येही असाच प्रकार समोर आला असून त्यावरही कारवाई सुरू झाली. संबंधित व्यक्तीला नोटीस बजावली. स्वराज्य विहारसमोर जो पूल बांधलेला आहे, त्याबद्दल संबंधित विभागाकडून माहिती घेऊ. त्यानंतर आयुक्तांच्या सूचनेनुसार कारवाई करू. – सुनीता हिबारे, महापालिकेच्या झोन अधिकारी
Source link
साेलापूर महापालिकेचा अजब कारभार!:आदिला नदीच्या पात्रात थेट स्वखर्चाने पूल बांधण्याची बेकायदा परवानगी, मनपाचे अधिकारीच आता आरोपीच्या पिंजऱ्यात