![]()
एसटी महामंडळाच्या बैठकीत आज अभूतपूर्व गदारोळ आणि हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा सुरू असतानाच आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर प्रचंड आक्रमक झाले. त्यांनी एसटीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने मध्यस्थी केल्यामुळे बैठकीतील मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एसटी कामगारांच्या आंदोलनानंतर परिवहन मंत्री यांनी ही बैठक बोलावली होती. मात्र, बैठकीला सुरुवात होताच सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. बैठकीत मूळ मुद्द्यांना बगल दिली जात असल्याचा आरोप आमदार सदाभाऊ खोत आणि गोपिचंद पडळकर यांनी केला. प्रशासनाकडून केवळ ‘५३ वरून ५८ टक्के डीए झाला’ असे सांगून बैठक गुंडाळण्याचा आणि कौतुक करून घेण्याचा प्रयत्न सुरू होता, असा आरोप आमदारांनी केला. कामगारांची पगारवाढ, घरभाडे भत्ता, मागील थकबाकी आणि कर्मचाऱ्यांचे विनाकारण झालेले निलंबन यावर कोणतीही ठोस चर्चा प्रशासनाकडून होत नव्हती. मागील बैठकांमध्ये अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे जे मुद्दे समोर आले होते, त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आमदारांचा संयम सुटला. एमडीच्या अंगावर धावून गेले आमदार यावरून अधिकाऱ्यांसोबत सुरू असलेल्या शाब्दिक चकमकीचे रूपांतर थेट धक्काबुक्कीच्या प्रयत्नात झाले. खोत आणि पडळकर हे दोघेही संतापाच्या भरात एमडी डॉ. कुसेकर यांच्या अंगावर धावून गेले. “भ्रष्टाचार करण्यासाठीच या अधिकाऱ्याला बसवले आहे का? यांना आधी बैठकीतून हाकलून द्या, तरच आम्ही खाली बसू,” अशी अत्यंत ताठर भूमिका या दोन्ही आमदारांनी घेतल्याने बैठकीत मोठा तणाव निर्माण झाला होता. सदाभाऊ खोतांचा सरनाईकांवरही निशाणा या गोंधळानंतर बैठकीतून बाहेर पडलेल्या सदाभाऊ खोत यांनी एमडींसोबतच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावरही कडाडून टीका केली. “एसटीला प्रताप सरनाईक यांच्या रूपाने एक कणखर मंत्री मिळाला आहे, असे मला वाटले होते. पण आता लक्षात येतेय की, ते स्वतःच या भ्रष्टाचाराच्या गटारगंगेचे साक्षीदार बनत आहेत, याचे मोठे दुःख वाटते,” असा घणाघात खोत यांनी केला. “एमडी रोज भ्रष्टाचाराच्या गंगेत आंघोळ करत असेल आणि मागील चर्चेतील मुद्द्यांवर कोणतीही कारवाई करत नसेल, तर अशा माणसासोबत बैठकीला बसण्यात काय अर्थ आहे?” असा संतप्त सवालही सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला. प्रताप सरनाईकांचा उपमुख्यमंत्री शिंदेना फोन एकीकडे आमदारांचा संताप आणि दुसरीकडे अधिकाऱ्यांवरील आरोप, अशा दुहेरी पेचात सापडलेल्या मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. कामगारांना आणि नेत्यांना आश्वस्त करण्यासाठी सरनाईक यांनी बैठकीतूनच थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला. सर्वांसमोर फोन ‘स्पीकर’वर टाकून त्यांनी उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी एसटी कामगारांचे सर्व प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे ठोस आश्वासन दिल्याने परिस्थिती काहीशी निवळली.
Source link
एसटी महामंडळाच्या बैठकीत हाय-व्होल्टेज ड्रामा!:एमडींच्या अंगावर धावून गेले खोत-पडळकर; मंत्री प्रताप सरनाईकांसमोरच मोठा राडा