![]()
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वर्धापन दिन सोहळा आज मुंबई साजरा करण्यात आला. अजित पवारांशिवाय होणारा हा पहिला वर्धापन दिन कार्यक्रम होता. या कार्यक्रमात पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांनी क्रिकेटचे रूपक वापरत पक्षश्रेष्ठींसमोर थेट मंत्रिपदाची सुप्त इच्छा व्यक्त केली आहे. “स्टेजवर बसलेल्यांना संधी मिळाली आहे, पण समोर बसलेले कार्यकर्ते विचारतायत की आम्ही नेहमी १२ वे खेळाडूच राहणार का? आम्हाला कधी संधी मिळणार?” असा सवाल उपस्थित करत मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे आपली राजकीय महत्त्वाकांक्षा बोलून दाखवली. त्यांच्या या राजकीय गुगलीवर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर देत “तुमचा इशारा आम्हाला समजला आहे, काळजी करू नका,” असे सूचक आश्वासन दिले आहे. कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी समोर बसलेल्या कार्यकर्त्यांची भावना मांडताना तुफान फटकेबाजीकेली. ते म्हणाले, “”मघासपासून इथे खेळाचा विषय सुरू आहे. आज मी समोर बसलेल्या जनतेची आणि कार्यकर्त्यांची भावना मांडणार आहे. स्टेजवर बसलेल्या नेत्यांना संधी मिळाली आहे, पण समोरचे विचारतायत की आम्ही क्रिकेटच्या संघात फक्त १२ व्या स्थानावरच (राखीव खेळाडू) राहणार का? आम्हाला कधी मुख्य मैदानात खेळण्याची संधी मिळणार? मी तुमच्यातलीच एक असल्याने तुमच्या भावना जाहीरपणे मांडल्या आहेत.” या विधानातून मुंडे यांनी केवळ कार्यकर्त्यांचाच नाही, तर स्वतःलाही मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळावी, अशी इच्छा अप्रत्यक्षपणे पक्षश्रेष्ठींकडे बोलून दाखवल्याचे बोलले जात आहे. कर्तृत्वला, निष्ठेला, कामाला पक्षाने सर्वश्रेष्ठ स्थान देणे गरजेचे आपल्या भाषणात धनंजय मुंडे यांनी क्रिकेटमधील दोन अत्यंत वेगळी उदाहरणे देत पक्षातील मोजमापावर भाष्य केले. ज्या सूर्यकुमार यादवने देशाला वर्ल्ड कप जिंकून दिला, त्यालाही कधी कधी संघात स्थान मिळत नाही. तर दुसरीकडे अवघ्या १५ व्या वर्षी वैभव सूर्यवंशीला संधी मिळते. याचा अर्थ स्पष्ट आहे—खेळ असो वा राजकारण, कर्तृत्व, कार्यकर्त्याची निष्ठा आणि त्याच्या कामाचे मोजमाप यांना पक्षाने सर्वश्रेष्ठ स्थान दिले पाहिजे. तरच अजितदादांचे महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर नेण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.” असे धनंजय मुंडे म्हणाले. अजितदादांनी रस्त्यावरच्या खड्याला घडवलं यावेळी धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “अजितदादांनी माझ्यासारख्या रस्त्यावरच्या खड्याला पैलू पाडून घडवले. तीच दूरदृष्टी आणि विचार आता मला सुनेत्रा वहिनी यांच्यामध्ये पाहायला मिळत आहे,” असे म्हणत त्यांनी पवार कुटुंबीयांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला. तसेच, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ‘नंबर वन’ करण्यासाठी सर्वांनी संघर्ष आणि नवा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. प्रफुल पटेलांचे मुंडेंना सूचक आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर मंचावर उपस्थित ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी मुंडेंच्या मनातील इच्छा ओळखून त्यांना जाहीर आश्वस्त केले. प्रफुल पटेल मुंडेंना उत्तर देताना म्हणाले, “शेवटचा कार्यकर्ता कुणीही ‘नॉट आउट’ राहिला पाहिजे, हा धनंजय मुंडेंनी दिलेला इशारा आम्हाला पूर्णपणे समजलेला आहे. त्यामुळे तुम्ही त्याची अजिबात चिंता करू नका. राजकारणात रिटायर्ड हर्ट होणाऱ्यालाही परत बॅटिंग करण्याची परवानगी मिळत असते. त्यांची गणना बाद झालेल्या खेळाडूंमध्ये होत नाही. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका; आपण सर्वांनी जास्तीत जास्त काम करून पक्ष वाढवावा.”
Source link
आम्ही फक्त 12 वे खेळाडूच राहणार का?:धनंजय मुंडेंची पक्षाच्या वर्धापन दिनी पक्षश्रेष्ठींसमोर मंत्रिपदाची इच्छा व्यक्त, प्रफुल पटेलांचेही आश्वासन