![]()
अमरावती येथील काँग्रेस नगर रोडवरील गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) कार्यालयाची भिंत कचऱ्याने वेढली आहे. भिंतीलगत अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. बाजूलाच मुख्य रस्ता असल्याने या कचऱ्यातून निर्माण होणारे जीवजंतू नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी पुढे आली आहे. नागरिकांच्या मते, वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रशासनाकडून याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये प्रशासनाप्रती तीव्र संताप व्यक्त होत आहे. पावसाळा तोंडावर असताना, या साचलेल्या कचऱ्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. हा परिसर शहरातील वर्दळीचा आणि महत्त्वाचा मार्ग म्हणून ओळखला जातो. राजकमल चौक, काँग्रेस नगर, चपराशी पुरा आणि वडाळी या प्रमुख भागांना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. येथून दररोज शेकडो नागरिक, शाळकरी मुले आणि वाहनांची ये-जा सुरू असते. या ठिकाणी गॅस एजन्सी, मुलांच्या शाळा आणि मंदिर असल्याने नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. अशा गजबजलेल्या रस्त्यावरच कचऱ्याचे ढिग साचल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. दर रविवारी होमगार्ड सैनिकांची साप्ताहिक परेड येथे असते, त्यांनाही या दुर्गंधीचा त्रास होतो. हा कचरा वेळेत उचलला गेला नाही, तर पावसाच्या पाण्याने तो सडून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरेल. डेंग्यू, मलेरिया, डायरिया यांसारख्या गंभीर आजारांची भीती नाकारता येत नाही. डासांची पैदास होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. होमगार्ड ऑफिस परिसर आणि मुख्य रस्त्यावरील साचलेला कचरा महानगरपालिकेने त्वरित उचलावा, अशी नागरिकांची मागणी आहे. या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून किंवा गस्ती पथकाद्वारे कडक कारवाई करण्यात यावी. तसेच, हा मुख्य आणि वर्दळीचा रस्ता असल्याने या भागाची दैनंदिन स्वच्छता सुनिश्चित केली जावी, अशीही नागरिकांनी मागणी केली आहे. केवळ होमगार्ड कार्यालयाचाच नव्हे, तर इतर शासकीय कार्यालयांची स्थितीही याहून वेगळी नाही. झाडांच्या फांद्या तोडणारी यंत्रणा वेगळी आणि त्या उचलून दूरवर नेऊन टाकणारी यंत्रणा वेगळी, अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळे झाडाच्या फांद्या अनेक दिवस तशाच पडून राहतात. महानगरपालिकेने आधी कचरा करायचा आणि अनेक दिवस तो तसाच पडून राहू द्यायचा, ही पद्धत बदलण्याची गरज आहे.
Source link
अमरावती होमगार्ड कार्यालयाला कचऱ्याचा विळखा:नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, प्रशासनावर संताप