![]()
पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि खर्चात बचत करण्यासाठी ‘आकांक्षा फाउंडेशन’चे शैक्षणिक मॉडेल राबवण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. महापालिका सभागृहनेते गणेश बिडकर यांनी याबाबत माहिती दिली. या मॉडेलमुळे प्रति विद्यार्थी खर्च कमी होऊन शिक्षणाची गुणवत्ता वाढेल, असा दावा करण्यात आला आहे. आकांक्षा फाउंडेशन पुणे शहरात अनेक वर्षांपासून शाळा चालवत आहे. सध्या या संस्थेमार्फत सुमारे पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या उपक्रमांसाठी निविदा प्रक्रिया राबवून आतापर्यंत १५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. सभागृहनेते बिडकर यांच्या माहितीनुसार, सध्या महापालिकेच्या शाळांमध्ये एका विद्यार्थ्यामागे सुमारे ३८ हजार रुपये खर्च येतो. आकांक्षा फाउंडेशनसोबत भागीदारी केल्यास हा खर्च प्रति विद्यार्थी सुमारे २५ हजार रुपयांपर्यंत कमी होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला आहे. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यामागे साधारण 13 हजार रुपयांची बचत होऊ शकणार आहे. परिणामी मनपा वरील खर्चाचा ताण देखील कमी होण्यास मदत होईल. या पार्श्वभूमीवर, महापालिकेने या उपक्रमात काही प्रमाणात सहभाग घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रक्रियेचे ऑडिट महापौरांच्या अध्यक्षतेखाली केले जाईल. यासाठी एक स्वतंत्र अभ्यासगट स्थापन करण्यात येणार आहे. या मॉडेलचा यशस्वी अनुभव लक्षात घेता, महापालिका प्रशासन हे मॉडेल इतर शाळांमध्येही राबवण्याचा विचार करत आहे. एमआयटी, सिम्बॉसिस, सिंहगड कॉलेज यांसारख्या नामांकित शैक्षणिक संस्थांनीही या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेच्या शिक्षण व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो, अशी चर्चा आहे.
Source link
आकांक्षा फाउंडेशन मॉडेल मनपा शाळांत राबवणार:प्रति विद्यार्थी खर्च कमी, शिक्षणाची गुणवत्ता वाढणार