बीड जिल्ह्यातील गाजत असलेल्या विलास घुले हत्याप्रकरणाला आता नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणात पीडित महिलेने गंभीर आरोप करत संपूर्ण घटनाक्रम उघड केला आहे. दरम्यान, या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार बजरंग सोनवण
.
ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याचा आरोप
पीडित महिलेने आरोप केला आहे की, विलास घुलेचा मित्र उमेश माने याने तिच्यासोबत बळजबरी करून अत्याचार केला आणि त्याचे व्हिडिओ तयार केले. हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने वारंवार ब्लॅकमेल केले आणि पुन्हा अत्याचार केला. हा प्रकार तिने कुटुंबीयांना सांगितला होता आणि पोलिसांकडे तक्रार देण्याची तयारीही केली होती.
मात्र, रमेश घुले याने “तक्रार दिली तर तुमचं काही खरं नाही,” अशी धमकी दिल्याचा आरोपही महिलेने केला आहे. त्यानंतर कुटुंबाने गावातील शेत सोडून दुसरीकडे राहण्याचा निर्णय घेतला. तरीही उमेश माने आणि विलास घुले हे बुलेट व काळ्या स्कॉर्पिओमधून येऊन सतत त्रास देत असल्याचा आरोप तिने केला आहे.
‘संबंध ठेव, नाहीतर नवरा आणि मुलांना मारू’
महिलेच्या म्हणण्यानुसार, 3 जून रोजी विलास घुलेने संबंध ठेवण्यास नकार दिल्यास तिच्या नवऱ्याला आणि मुलांना ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर 20 जून रोजी तो पुन्हा घरासमोर येऊन हॉर्न वाजवत शिवीगाळ करू लागला.
यावेळी तिचे वडील, पती आणि इतर नातेवाईक त्याला समजावण्यासाठी गेले असता, विलास घुले आणि त्याच्या साथीदारांनी काचेच्या बाटल्या व विटांच्या तुकड्यांनी हल्ला सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर झालेल्या झटापटीत महिलेच्या वडिलांनी प्रतिकार केला आणि त्यातून पुढे घडलेल्या घटनांमध्ये विलास घुलेचा मृत्यू झाला.
‘पोलिसांनी आमची तक्रारच घेतली नाही’
पीडित महिलेने असा आरोप केला आहे की, या सर्व प्रकारानंतर त्यांनी केज आणि बीड पोलिसांकडे जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. “आम्हाला न्याय द्यावा आणि आमची तक्रार नोंदवावी,” अशी मागणी तिने केली आहे.
खासदार पुत्राच्या नावामुळे खळबळ
या प्रकरणातील पुरवणी जबाबात सौरभ सोनवणे यांचे नाव आल्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. त्यानंतर एसआयटीने त्यांची चौकशी केली. यापूर्वी सौरभ सोनवणे आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी तपासात पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका जाहीर केली होती.
व्हिडिओमधील दाव्यामुळे तपासाला नवे वळण
महिलेच्या आरोपांदरम्यान आणखी एक दावा समोर आला आहे. आरोपींनी एका व्हिडिओमध्ये “खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव घेऊन आमचे कोणी काही करू शकत नाही,” असे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दाव्याची सत्यता आणि त्यामागील परिस्थितीची पडताळणी तपास यंत्रणांकडून केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात आधीच अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून, आता पीडित महिलेच्या नव्या आरोपांमुळे तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून सर्व आरोपांची सखोल चौकशी सुरू असून, तपासानंतरच संपूर्ण सत्य समोर येणार आहे.
फुटेजच्या आधारे आणखी एकाला लातूरमधून अटक
टाकळी (ता. केज) येथील हॉटेल चालक विलास घुले यांच्या हत्याप्रकरणात एफआयआरमध्ये नाव नसलेला मात्र तपासात निष्पन्न झालेल्या दहाव्या आरोपीला एसआयटीने लातूरहून रविवारी अटक केली. प्रकरणात सुरुवातीला अटकेतील २ जणांची पोलिस कोठडी ५ दिवसांनी वाढली आहे. टाकळी येथील विलास घुले यांच्या हॉटेलवर उमेश माने यास मारहाण होत असताना भांडण सोडवण्यास गेलेले विलास घुले यांची रामेश्वर गायकवाड याने भोसकून हत्या केली होती. याप्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. पुरवणी जबाबात खासदारपुत्र सौरव बजरंग सोनवणे यांचे नाव आहे. तपासात राजकुमार मोरे (रा. सोनीजवळा) हा निष्पन्न केला होता. तो सीसीटीव्ही फुटेजमध्येही दिसत होता. मात्र, त्याचा तक्रारीत उल्लेख नव्हता. मात्र तो घटनेपासून पसार होता. त्याचा गुन्ह्यातील सहभाग निश्चित झाल्यानंतर पथक त्याच्या मागावर होते. रविवारी लातरहून त्याला अटक केली. पोलिसांनी सुरुवातीला अटक केलेल्या बाबासाहेब कदम, संतोष कदम या दोघांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने रविवारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने दोघांना आणखी पाच दिवसाची पोलिस कोठडी वाढवून दिली.
कँडल मार्च काढला
रविवारी सायंकाळी ७ वाजता विलास घुले यांच्या घरापासून कँडल मार्च काढला. ज्या ठिकाणी घुले यांची हत्या झाली.या घटनास्थळापर्यंत कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी घुले कुटुंबीयांसह गावातील महिला व नागरिक सहभागी झाले.
संबंधित बातमी वाचा…
मी बीडचा वाघ, घाबरत नाही!:विलास घुले हत्याप्रकरणी मुलावरील आरोपांवर खासदार बजरंग सोनवणे आक्रमक; धनंजय मुंडेंवर नाव न घेता घणाघात

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कदमवाडी येथील ‘गावकरी’ हॉटेलचे मालक विलास घुले यांच्या हत्याप्रकरणी आता राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शोधण्याची मागणी परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत केल्यानंतर, आणि खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे यांच्यावर मृताच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यानंतर, खासदार सोनवणे यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. “मी काय भित्रा नाही, मी बीडचा वाघ आहे,” असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली. येथे वाचा संपूर्ण बातमी
बीड हत्याकांडाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित:मुंडे बंधू-भगिनी आक्रमक, पूर्वनियोजित कटाचा आरोप, सभागृहात जोरदार चर्चा

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या विलास घुले यांच्या हत्येचे तीव्र पडसाद आज थेट विधानसभेत उमटले. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले असून, आरोप-प्रत्यारोप, चौकशीची मागणी आणि कठोर कारवाईच्या सूचना यामुळे सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या प्रकरणावर परळीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सभागृहात जोरदार भूमिका घेत या हत्येमागील मास्टरमाईंडचा पोलिसांकडून बचाव सुरू आहे, असा गंभीर आरोप केला. तर मंत्री पंकजा मुंडे यांनीही या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत सखोल तपासाची मागणी केली आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेत गृह विभागाला योग्य चौकशीचे निर्देश दिले आहेत. येथे वाचा सविस्तर बातमी
बीडमध्ये खळबळ!:भांडणात मध्यस्थी करायला गेलेल्या हॉटेल चालकाची चाकूने भोसकून हत्या, केजमध्ये तणावाचे वातावरण

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात दोन गटांतील भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या विलास घुले या हॉटेल चालकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून, अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचारादरम्यान काल दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.
या भीषण घटनेमुळे केज परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी संतप्त नातेवाइकांनी थेट पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन वेळा रस्ता रोको आंदोलन केल्यामुळे परिसरातील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती. येथे वाचा संपूर्ण बातमी