![]()
महाज्योतीच्या माध्यमातून यंदाच्या शैक्षणिक वर्षात ७३० विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्राशी संबंधित विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी ३ नामांकित संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून, महाज्योतीसाठी ७२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची घोषणा बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केली. विधान परिषदेत सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. या चर्चेत सदस्य परिणय फुके आणि सतेज पाटील यांनीही सहभाग घेतला होता. मंत्री सावे यांनी सांगितले की. कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील कौशल्य विकासाला गती देण्यासाठी महाज्योतीने पोस्ट हार्व्हेस्ट टेक्नॉलॉजी राष्ट्रीय संस्था (पुणे), महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पुणे) या तीन प्रमुख संस्थांसोबत सामंजस्य करार केले आहेत. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम मंजूर करण्यात आला असून, याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील सामंजस्य करार ९ जून २०२६ रोजी करण्यात आला आहे. आतापर्यंत पोस्ट हार्व्हेस्ट टेक्नॉलॉजी संस्थेमार्फत सुमारे २५०, तर एमडीसी मार्फत ४८० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. १५०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी, ७२८ कोटी मंजूर मंत्री सावे यांनी सांगितले की, महाज्योतीसाठी एकूण १५०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी वित्त विभागाकडे करण्यात आली असून, सध्या ७२८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. नागपूर आणि नाशिक येथे महाज्योतीच्या नवीन वसतिगृहांचे बांधकाम सुरू असून त्यासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. महाज्योतीच्या विविध उपक्रमांमुळे हजारो विद्यार्थ्यांना रोजगाराच्या आणि उच्च शिक्षणाच्या संधी मिळाल्या आहेत. सध्या ६,९०० विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण घेत आहेत. १४,००० विद्यार्थी कौशल्य विकास कार्यक्रमांत सहभागी झाले आहेत. २,७०९ विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी प्रवेश मिळाला आहे. यूपीएससी परीक्षेत १००, एमपीएससी परीक्षेत ३७१, तर पोलिस भरती, बँक व इतर परीक्षांमध्ये २,०३१ उमेदवारांची निवड झाली आहे. एकूण २,५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्या टप्प्यात २१.७५ लाख रुपये, दुसऱ्या टप्प्यात ४८ लाख रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात ५१ लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले आहे. तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी आधुनिक शेतीचे धडे महाज्योतीचा हा उपक्रम प्रामुख्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी गेमचेंजर ठरणार आहे. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी या विद्यार्थ्यांना पोस्ट हार्व्हेस्ट टेक्नॉलॉजी आणि अन्न प्रक्रियेचे मोफत व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे शेतकऱ्यांची मुले केवळ शेतमजूर न राहता कृषी उद्योजक बनतील आणि शेतीमालाला थेट बाजारपेठ मिळवून देऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवा चेहरा देतील. महाज्योतीच्या या नव्या कृषी प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
Source link
यंदा 730 विद्यार्थ्यांना मिळणार शेतीविषयक प्रशिक्षण:3 नामांकित संस्थांसोबत सामंजस्य करार; महाज्योतीसाठी 728 कोटींचा निधी मंजूर- सावे