Headlines

उत्पन्न वाढ अन् विकास; आयुक्तांचा निर्धार:आयुक्त डाॅ. मंगेश गोंदावले यांची मुलाखतीदरम्यान ग्वाही‎




शहरातील एकूणच समस्यांची मला सखोल माहिती घ्यावी लागणार असून सद्यस्थितीत असलेल्या परिस्थितीचा आढावा घेत. तसेच आवश्यक उपाययोजना करीत शहरवासीयांचे जीवनमान उंचावण्याचा मी प्रयत्न करणार आहे, असे महानगर पालिकेचे नव्याने नियुक्त आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी दिव्य मराठीला मुलाखतीदरम्यान सांगितले. २०१५ च्या आयएएस तुकडीचे ते कार्यक्षम अधिकारी असून याआधी त्यांना विविध विभागात काम करण्याचा दांडगा अनुभव आहे. अमरावतीत येण्याआधी ते गोंदियाचे जिल्हाधिकारी राहिले आहेत. अमरावती महानगर पालिकेची एकूणच बेतात्या आर्थिक स्थितीबाबत आपल्याला फार नाही परंतु, काहीशी जाणीव आहे. पैशाशिवाय कोणतेही काम होत नसल्याने आधी मनपाचे उत्पन्न कसे वाढेल व स्थिर राहील यासाठी उपाययोजना करण्यावर मी भर देणार आहे. त्याचप्रमाणे गेल्या काही महिन्यांपासून शहरातील रखडलेली विकास कामे कशी पूर्ण करता येईल, याकडेही लक्ष देणार असल्याचे डॉ. गोंदावले यांनी सांगितले. शहरातील अस्वच्छतेवरून नागरिकांच्या मनात असलेला रोष मला कळला आहे. या मुद्यावर कामकाजाची सुत्रे हाती घेतल्यानंतरच बोलणे योग्य राहील. कारण, नेमके कंत्राटात काय नमूद आहे, त्याविषयी कळाल्याशिवाय काहीच बोलता येणार नाही. मात्र, शहराच्या विकासात कोणताही अडथळा येऊ देणार नाही. शहरवासीयांना आवश्यक सर्व मुलभूत सोयी देण्याकडे माझा कटाक्ष असेल. त्याचप्रमाणे जी कामे रखडली आहेत, ती पूर्ण करण्याचाही माझा प्रयत्न राहणार आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची माझी पद्धत आहे. त्याशिवाय विकास शक्य नाही. त्यामुळेच अमरावतीला आल्यानंतर सर्व परिस्थिती बघून नंतर काम सुरू करणार असल्याचे नव्या मनपा आयुक्तांनी स्पष्ट केले. महानगर पालिकेचे मर्यादित उत्पन्न, अस्वच्छतेची समस्या, रखडलेली कामे, प्रशासनातील महत्त्वाच्या बाबी याकडे लक्ष देण्यासाठी सुरुवातीला काही वेळ लागेल. त्यानंतर माझ्या पद्धतीनुसार मी कामाला वेग देईन. यासाठीच मी वेळ न घालवता लवकरात लवकर मनपात रूजू होणार आहे. मनपातील पदाधिकारी, प्रशासनातील अधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर मला एकूणच परिस्थितीची जाण होणार आहे. रविवारी घेणार हाती कामाची सुत्रे डॉ. गोंदावले हे रविवार १२ रोजी महानगर पालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतील. शनिवारी रात्री उशिरा त्यांचे शहरात आगमन होणार आहे. त्यामुळे शनिवारी कामावर रुजू होणे शक्य होणार नाही. मात्र, रविवारी कामावर रूजू होत सोमवारपासून काम सुरू करण्याचा मानस डॉ. गोंदावले यांनी व्यक्त केला. सर्वप्रथम ते मनपा अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून एकूणच परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *