![]()
नागपूरच्या कृष्णानगर परिसरात पैशांसाठी एका दिव्यांग ज्येष्ठ नागरिकाची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सहेसराम बाजीराव केवट (वय ६०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णानगर परिसरात ही घटना घडली. विलास सुभाष चौधरी (वय २५) याला अटक करण्यात आली असून, जितेंद्र संतोष वगारे (वय २५) आणि प्रवीण ढिल्लन चव्हाण (वय २५, सर्व रा. सुराबर्डी वस्ती) हे दोन आरोपी फरार आहेत. सहेसराम केवट यांचा चार वर्षांपूर्वी गँगरीनमुळे उजवा पाय कापावा लागला होता आणि ते कुबड्यांच्या आधाराने चालत होते. ते एकटेच राहत होते, त्यांची पत्नी वेगळी राहत असून दोन मुलींचे लग्न झाले आहे. अलीकडेच त्यांना ग्रामपंचायतीकडून शासकीय मदतीचे काही पैसे मिळाले होते. रविवारी रात्री त्यांच्या मुली आणि नातेवाईक भेटायला आले असताना, त्यांनी नातीसाठी चांदीचे कडे घेणार असल्याचे सांगितले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास कुटुंबीय निघून गेल्यानंतर, सहेसराम यांच्याकडे पैसे असल्याची माहिती आरोपींना मिळाली. विलास चौधरी, जितेंद्र वगारे आणि प्रवीण चव्हाण यांनी मध्यरात्री घरात प्रवेश केला. सहेसराम यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांना पकडून उशीने तोंड दाबून त्यांचा जीव घेतला. दरम्यान, घरातून संशयास्पद आवाज येत असल्याने शेजाऱ्यांनी सहेसराम यांची मुलगी रिमाला कळवले. ती तातडीने कुटुंबासह घटनास्थळी पोहोचली. दार आतून बंद होते. दार उघडताच एक आरोपी “दारू पिण्यासाठी आलो होतो” असे सांगत पळून गेला. घरात प्रवेश केल्यावर सहेसराम बेशुद्धावस्थेत आढळले आणि त्यांच्या खिशातील पैसे गायब होते. स्वयंपाकघरात लपलेले उर्वरित दोन आरोपीही दिसून आले. त्यांनी महिलांना ढकलून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सहेसराम यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
Source link
नागपुरात दिव्यांग ज्येष्ठ नागरिकाची हत्या:घरात घुसून पैशांसाठी जीव घेतला; तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा, एकाला अटक