Headlines

शाहीर हिंगे प्रबोधिनीच्या पोवाडा प्रशिक्षण वर्गाचा प्रारंभ:इतिहास संशोधक मंदार लवाटे म्हणाले, शाहिरी हे लोकसंस्कृतीचे वेद




पुणे येथे शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या निरंतर पोवाडा प्रशिक्षण वर्गाचा प्रारंभ झाला. यावेळी इतिहास संशोधक व मोडी लिपी तज्ज्ञ मंदार लवाटे यांनी शाहिरीला लोकसंस्कृतीचे वेद संबोधले. हा 30 व्या वर्षाचा विनामूल्य पोवाडा प्रशिक्षण वर्ग शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथील कलाग्राम दालनात उद्घाटन सोहळा पार पडला. ज्येष्ठ संकलक संजीव वेलणकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे अध्यक्षस्थानी होते. प्रबोधिनीच्या कार्याध्यक्ष प्राध्या. सौ. संगीता मावळेही यावेळी उपस्थित होत्या. मंदार लवाटे म्हणाले की, वेद हे ज्ञानाचे भांडार आहेत, त्याचप्रमाणे शाहिरी हे लोकसंस्कृतीचे वेद आहेत. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी संस्कृतीचे जतन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. त्यांनी आयुष्यात सतत शिकत राहण्याचे आणि प्रत्येक अनुभव व ज्ञानाचा कण साठवत राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. इंटरनेटपूर्व काळात मोठ्या घराण्यांमध्ये महत्त्वाच्या घटनांची नोंद केली जात असे, ज्या आज पुण्याच्या इतिहासातील महत्त्वाचे दस्तऐवज ठरल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले. आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी प्रबोधिनीच्या कार्यावर प्रकाश टाकला. पोवाडा या लोककलाप्रकाराचे जतन, संवर्धन आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे प्रबोधिनीचे मुख्य कार्य आहे. गेली 30 वर्षे विनामूल्य पोवाडा प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवले जात आहेत. पोवाडा ही केवळ कला नसून, ती इतिहास, शौर्य, राष्ट्रप्रेम आणि संस्कार यांची परंपरा जपणारी लोककला आहे, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षदा इनामदार यांनी केले, तर प्रीती खोसे यादव यांनी आभार प्रदर्शन केले. हा निरंतर पोवाडा वर्ग दर शनिवारी संध्याकाळी 7 ते 8:15 या वेळेत रमणबाग शाळेत होणार असून, फेब्रुवारी अखेरपर्यंत तो विनामूल्य असेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *