Headlines

पुण्यात 19 जुलै रोजी इस्कॉनची जगन्नाथ रथयात्रा:स.प. महाविद्यालयापासून प्रारंभ, 1 लाख भाविकांना महाप्रसाद वाटप




पुणे शहरात आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) पुणे यांच्यातर्फे रविवार, १९ जुलै रोजी जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ वाजता टिळक रस्त्यावरील स.प. महाविद्यालयापासून या यात्रेला प्रारंभ होईल. ओडिसामधील जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेच्या धर्तीवर हा उत्सव पुण्यात साजरा केला जातो. इस्कॉन कात्रज-कोंढवा रस्त्यावरील मंदिरातील भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांना या दिवशी विशेष दर्शनासाठी रथावर आणले जाईल, अशी माहिती इस्कॉन मंदिराचे प्रवक्ते जनार्दन चितोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. रथयात्रेचे उद्घाटन दुपारी १२ वाजता स.प. महाविद्यालयाच्या प्रांगणात होईल. या प्रसंगी इस्कॉन संस्थेचे संन्यासी प.पू. लोकनाथ स्वामी, इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हेमंत रासने, सुनील कांबळे, योगेश टिळेकर यांच्यासह पुणे शहरातील सर्व आमदार, नगरसेवक, पुणे महापालिकेतील पदाधिकारी तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मंदिराचे उपाध्यक्ष संजय भोसले यांनी दिली. मान्यवरांच्या हस्ते भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांची आरती झाल्यानंतर दुपारी १ वाजता रथयात्रेला सुरुवात होईल. ही रथयात्रा स.प. महाविद्यालय येथून निघून अभिनव महाविद्यालय चौक, बाजीराव रस्ता, शनिपार चौक, नगरकर तालीम चौक, लक्ष्मी रस्ता, शगुन चौक, रमणबाग शाळा, ओंकारेश्वर मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्ता मार्गे पुन्हा स.प. महाविद्यालयात समारोप होईल. या रथयात्रेत अनेक संन्यासी आणि महापुरुष सहभागी होणार असून, ठिकठिकाणी यात्रेचे उत्साहात स्वागत केले जाईल. रथयात्रेतील रथाची उंची २० फूट असून, तो फुलांसह रंगीबेरंगी कापडांनी सजवला जाईल. इस्कॉनचे पदाधिकारी आणि भाविक हा रथ ओढतील. रथयात्रेच्या समारोपानंतर भगवंतांना ५६ भोगांचा नैवेद्य अर्पण करून आरती केली जाईल. महाविद्यालयाच्या प्रांगणात रथयात्रेच्या सुरुवातीला आणि समारोपानंतर जवळपास २० हजार भाविकांना प्रसाद वाटप केले जाईल. तसेच, रथयात्रा मार्गावर १ लाख प्रसादाची पाकिटे वाटण्यात येणार आहेत. या रथयात्रेत २० हजार भक्त सहभागी होण्याची अपेक्षा आहे. सायंकाळी ७ वाजता आरती, दर्शन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *