Headlines

मुंबईत कोस्टल रोडच्या बोगद्यात धावत्या कारला भीषण आग:धुराचे लोट पसरल्याने वाहतूक ठप्प, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन




मुंबईकरांचा प्रवास वेगवान आणि सुकर करणाऱ्या ‘मुंबई कोस्टल रोड’च्या बोगद्यात आज एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक दुर्घटना घडली. बोगद्यातून जात असलेल्या एका कारला अचानक भीषण आग लागली. काही क्षणांतच या आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे संपूर्ण बोगद्यात काळ्या धुराचे साम्राज्य पसरले. या प्रसंगामुळे कोस्टल रोडवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली. बोगदा असल्याने कारमधून निघणारा विषारी धूर वेगाने पसरला. यामुळे समोरील रस्ता दिसेनासा झाला आणि काही वाहनचालकांना श्वास घेण्यास प्रचंड त्रास होऊ लागला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून बोगद्यातील प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी खबरदारी म्हणून आपापल्या गाड्या तिथेच सोडल्या आणि बोगद्याबाहेर जाण्यासाठी पायीच मागच्या दिशेने धाव घेतली. या संपूर्ण थराराचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यात बोगद्यातील भीषण परिस्थिती आणि धुराचे लोट स्पष्ट दिसत आहेत. अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू या दुर्घटनेनंतर प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून नरिमन पॉईंटकडून कोस्टल रोडच्या दिशेने येणारी वाहतूक तातडीने थांबवली, ज्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आणि बोगद्यात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. कोणतीही जीवितहानी नाही प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, मुंबईतील या अत्याधुनिक आणि महत्त्वाच्या प्रकल्पातील आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था, आग प्रतिबंधक उपाय आणि तत्पर बचाव यंत्रणेवर या निमित्ताने पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की इतर तांत्रिक बिघाडामुळे, याचा तपास सध्या प्रशासनाकडून केला जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *