![]()
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत पुणे–शिरूर द्रुतगती महामार्ग, हडपसर–यवत उन्नत मार्ग आणि तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्ग या तीन महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन शनिवार, 18 जुलै रोजी होणार आहे. पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे दुपारी 1.30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडेल. या भूमिपूजन कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित यंत्रणा आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या बैठकीस कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्यासह अनेक आमदार आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभाग नोंदवला. मंत्री भोसले यांनी सांगितले की, पुणे परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हे तीन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यांची प्रभावी आणि वेळेत अंमलबजावणी केली जाईल. सर्व प्रकल्पांची कामे चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हडपसर–यवत रस्ते प्रकल्प महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ आणि मेट्रो प्रशासनाच्या समन्वयातून राबविण्यात येणार आहे. वाहतूक व्यवस्थापनाबाबत पुणे महानगरपालिका व वाहतूक पोलिसांची स्वतंत्र बैठक घेतली जाईल. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रकल्पांच्या अंमलबजावणीदरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना व अपेक्षांचा योग्य विचार केला जाईल, असे नमूद केले. खासदार सुप्रिया सुळे यांनी पालखी मार्गावरील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याची सूचना केली, तर खासदार अमोल कोल्हे यांनी पुणे–शिरूर रस्ते प्रकल्पासाठी सर्वसमावेशक वाहतूक आराखडा तयार करण्याची आवश्यकता व्यक्त केली. यावेळी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे मुख्य अभियंता रणजीत हांडे यांनी सादरीकरणाद्वारे तीनही प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली.
Source link
पुणे-शिरूर द्रुतगती महामार्गासह 3 मेगा प्रकल्पांचा शुभारंभ:18 जुलैला नितीन गडकरी अन् मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन