Headlines

सायबर फसवणुक:संभाजीनगरमधील बँक खात्यांचा वापर, चौघांवर गुन्हा दाखल




देशात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या सायबर फसवणुकीसाठी छत्रपती संभाजीनगरमधील ४ बँक खात्यांचा वापर केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात ४ जणांवर जवाहरनगर पोलिस ठाण्यात ४ स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. अन्य काही जणांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आवेज मसूद शेख (सादातनगर), सिद्दिकी फराज अहमद रिझवान अहमद (टाइम्स कॉलनी, कटकट गेट), आशिष सुभाष इंगळे (जेल क्वार्टर, हर्सूल) आणि सचिन धर्मराज जाधव (पैठण) अशी आरोपींची नावे आहेत. जवाहरनगर ठाण्याच्या पोलिसांनी ४ स्वतंत्र फिर्यादी दिल्या आहेत. नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल (एनसीआरपी) आणि ‘समन्वय’ पोर्टलवरील माहितीच्या विश्लेषणातून ही नावे समोर आली आहेत. प्रामुख्याने ११ खात्यांत झालेल्या फसवणुकीत यांचा वापर झाला असल्याने ही कारवाई केली आहे. सध्या पुढे आलेल्या या ४ खात्यांत एकूण १९ लाख ६५ हजार रुपये जमा झाले. ही रक्कम वेगवेगळ्या टप्प्यांत व वेगवेगळ्या खात्यांतून वळती केली आहे. रक्कम जमा झाल्यावर आठवडाभरात ती धनादेश, कॅश अथवा एटीएम कार्डाद्वारे काढण्यात आली अथवा अन्य खात्यांत वळती केली आहे. त्यामुळे गुन्ह्यातील ‘मनी ट्रेल’ यातून स्पष्ट होत आहे. सायबर पोलिसांचा ॲक्शन मोड सायबर गुन्ह्यांबाबत सायबर ठाण्यातील अधिकारी, अंमलदारांवर विविध ठाण्यांची जबाबदारी दिली आहे. हे पथक गुन्ह्यांतील खात्यांचा शोध घेऊन गुन्हे दाखल करत आहे. खाते भाड्याने दिल्याप्रकरणी एमआयडीसी सिडकोत २, तर पुंडलिकनगर आणि मुकुंदवाडी येथील प्रत्येकी एका आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. इनसाइड: कमिशनवर चालतो कारभार सायबर फ्रॉडसाठी वेगवेगळ्या बँक खात्यांची गरज भासते. फसवणूक झालेल्या व्यक्तीने तातडीने तक्रार दाखल केल्यास संबंधित रक्कम वळती झालेले पहिले खाते फ्रीझ केले जाते. अशा वेळी ती रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांत वळती करण्यात येते. त्यासाठी देशभरात कमिशनवर खाते भाड्याने देण्याचा धंदा चालतो. या गुन्ह्यात वापरलेल्या सर्व खातेधारकांना मूळ गुन्ह्यात सहआरोपी केले जाते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *