![]()
पुण्यात एका ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाइन डॉक्टर अपॉइंटमेंट घेताना सायबर चोरट्यांनी पावणेआठ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. नातू आजारी असल्याने बालरोगतज्ज्ञांची अपॉइंटमेंट घेण्याचा प्रयत्न करत असताना हा प्रकार घडला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक धानोरी भागात राहतात. त्यांनी संकेतस्थळावरून बालरोगतज्ज्ञांचा मोबाइल क्रमांक मिळवला होता, पण तो क्रमांक सायबर चोरट्यांनी बदलून आपला टाकला होता. ज्येष्ठ नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधल्यावर, चोरट्यांनी त्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागेल आणि त्यासाठी पाच रुपये शुल्क ऑनलाइन जमा करण्यास सांगितले. ही रक्कम जमा झाली नाही, तरी चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर ‘ओटीपी’ पाठवला. ज्येष्ठ नागरिकांनी कोणताही ‘ओटीपी’ कोणालाही दिला नसतानाही, सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून 7 लाख 73 हजार रुपये दुसऱ्या खात्यात वर्ग केले. खात्यातून पैसे गेल्याचे लक्षात येताच, ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक सचिन राऊत या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे सत्र सुरूच आहे. नऱ्हे भागातील एका महिलेची सायबर चोरट्यांनी 8 लाख 46 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत महिलेने नऱ्हे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक वर्षा देशमुख तपास करत आहेत. अशाच प्रकारे, पाषाण भागातील एका व्यक्तीची 28 लाख 17 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे तपास करत आहेत.
Source link
नातवासाठी बालरोगतज्ज्ञ शोधणे पडले महाग:63 वर्षीय वृद्धाची पावणेआठ लाखांची फसवणूक, विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल