Headlines

शिंदे गटात गेल्यानंतरही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा:खासदार संजय जाधवांच्या पोस्टची राजकीय वर्तुळात चर्चा




शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का देत एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले परभणीचे खासदार संजय जाधव यांनी आज उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांनी टाकलेल्या पोस्टमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. खासदार जाधव यांना काही काळापूर्वी ठाकरे गटातून बंड केले होते. म्हणून उद्धव ठाकरे यांनीच परभणीत जाऊन जाहीर टीका केली होती. त्यामुळे आजच्या शुभेच्छांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संजय जाधव यांनी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि एक्स या तिन्ही प्लॅटफॉर्मवरून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या पोस्टमध्ये, “मा. उद्धव साहेब ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, या सदिच्छा,” असा मजकूर लिहिण्यात आला होता. उद्धव ठाकरे यांना थेट आणि सन्मानपूर्वक शुभेच्छा दिल्यामुळे ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. बंडखोर सहा खासदारांमध्ये संजय जाधवांचाही होता समावेश ठाकरे गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामध्ये संजय जाधव यांचाही समावेश होता. त्या घटनेनंतर उद्धव ठाकरे स्वतः परभणीत गेले होते आणि संजय जाधव यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे आज जाधव यांनी दिलेल्या शुभेच्छांकडे राजकीय वर्तुळात वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे. विशेष म्हणजे, फुटीनंतर संजय जाधव आणि उद्धव ठाकरे यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परभणीत जाहीर सभा घेऊन जाधव यांच्यावर घणाघाती हल्ला केला होता. त्यामुळे आजच्या मैत्रीपूर्ण शुभेच्छा म्हणजे राजकीय कटुता काहीशी शमते आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. सोशल मीडियावर पोस्ट, नेटकऱ्यांच्या चर्चेला उधाण संजय जाधव यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्यानंतर सोशल मीडियावरही त्यावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काही जणांनी याकडे सौजन्याचा संकेत म्हणून पाहिले, तर काहींनी यामागे राजकीय गणित असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शिवसैनिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला असतानाच, शिंदे गटात गेलेल्या संजय जाधव यांची ही पोस्ट मात्र विशेष लक्ष वेधून घेत आहे. राजकीय मतभेद तीव्र असतानाही व्यक्तिगत पातळीवर शुभेच्छा देण्याचा हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, संजय जाधव यांनी दिलेल्या या शुभेच्छांमागे केवळ औपचारिकता आहे की पुढे काही राजकीय संकेत दडलेले आहेत, यावर आता विविध तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच सेलू येथे आयोजित सत्कार कार्यक्रमात बोलताना बंडू जाधव यांनी अनेक महत्त्वाचे खुलासे केले होते. विशेष म्हणजे, त्यांनी उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरे यांना राज्यभर फिरवण्याचा सल्ला दिला होता, असा दावाही यावेळी केला होता. “उद्धवसाहेब तुम्हाला जमत नव्हतं, पण आदित्य ठाकरेंना तरी फिरवा म्हटलं होतं” बंडू जाधव म्हणाले होते की, शिवसेनेत फूट पडू लागल्यानंतर पक्षातून एकामागून एक नेते आणि कार्यकर्ते बाहेर पडताना आम्ही स्वतः पाहत होतो. त्या काळात आपण स्वतः उद्धव ठाकरेंना भेटून स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं. “साहेब, तुमची तब्येत ठीक नसते. तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र फिरणं शक्य नसेल, पण किमान आदित्य ठाकरे यांना तरी राज्यभर पाठवा. त्यांनी संघटनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांना भेटावं. त्यांच्या भावना जाणून घ्याव्यात.” मात्र, तसं झालं नाही. पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष झालं आणि कार्यकर्त्यांशी संवाद तुटत गेला. त्याचाच परिणाम म्हणून अनेक नेते आणि पदाधिकारी पक्ष सोडून गेले, असा दावा त्यांनी केला होता. 2022 ला काय कमी पैसे मिळाले असते का? आता काही लोक म्हणतात, संजय राऊतही म्हणतात की, पैसे भेटले म्हणून हे फुटले. पण पैसेच घ्यायचे असते तर मग 2022ला काय कमी पैसे मिळाले असते का? राहिलोच ना तेव्हा सोबत. पण 2022 नंतर पक्ष संघटना कमकुवत होत गेली, एका पाठोपाठ एक कार्यकर्ते, नेते जात राहिले. म्हणून स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह आणि येथील विकास यासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. सत्तेत असल्यावर स्थानिक विकास करता येईल, पक्षाचं संघटनेचं काम चांगलं करता येईल ही भावना कार्यकर्त्यांची होती, म्हणूनच आम्हाला शेवटी निर्णय घ्यावा लागल्याचंही बंडू जाधव त्यावेळी म्हणाले होते. हेही वाचा.. राज्यात पुन्हा पावसाचा कहर:कोकण, घाटमाथा, नाशिकसह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा, पुढील 12 तास महत्त्वाचे राज्यात पुन्हा एकदा मान्सूनने जोरदार पुनरागमन केले असून अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकण, घाटमाथा, नाशिक, मुंबईसह विविध जिल्ह्यांत संततधार सुरू असताना भारतीय हवामान विभागाने पुढील 12 तासांसाठी महाराष्ट्रासह देशातील 18 राज्यांना मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा दिला आहे. काही भागांत ताशी 80 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *