![]()
शहरातील विजापूर रोड परिसरातील रेल्वे ट्रॅकजवळ एका ३३ वर्षीय महिलेने आपल्या १४ वर्षांच्या मुलीसह धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याची प्राथमिक माहिती नातेवाइकांनी दिली
.
वर्षा पांडुरंग अधटराव (३३) आणि स्वरा पांडुरंग अधटराव (१४, दोघी रा. सुशीलनगर, सोलापूर) अशी आत्महत्या केलेल्या मायलेकींची नावे आहेत. दरम्यान, दोघींनी कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत असले तरी पोलिस सर्व बाजूंनी तपास करत असल्याचे सांगण्यात आले आहे.
नात्यातीलच आत्याच्या मुलाशी झाले होते लग्न
वर्षा यांचे लग्न नात्यातीलच आत्याच्या मुलाशी झाले होते. त्यांना दोन मुली आहेत. पती-पत्नी या दोघांची किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती. या वादातून वर्षा आपल्या १४ वर्षांच्या मुलीस घेऊन शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घराबाहेर पडल्या. खूप वेळ झाला तरी त्या घरी आल्या नाहीत. पती पांडुरंग यांनी विजापूर नाका पोलिसांत हरवल्याची तक्रार दिली होती. पोलिसांना तक्रारीत दिलेल्या अर्जानुसार रेल्वेखाली दोन महिलांची आत्महत्या झाल्याची माहिती मिळाली होती. त्याची खातरजमा करण्यासाठी नातेवाइकांना पोलिसांनी बोलावून घेतले.