Headlines

अधिकारी, कर्मचाऱ्यांनो, खासगी नोकर असल्यासारखे वागू नका:माजी आ. राहुल जगतापांचा इशारा; चिमुरड्यांच्या मृत्यूप्रकरणी तहसीलवर मोर्चा‎




लोणीव्यंकनाथ येथील दोन चिमुरड्या बहिणींच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि आंदोलक तरुणांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, या प्रमुख मागण्यांसाठी श्रीगोंदे तहसील कार्यालयावर लोणी ग्रामस्थांच्या वतीने सोमवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर झालेल्या सभेत बोलताना माजी आमदार राहुल जगताप यांनी पोलिस व प्रशासकीय अधिकाऱ्यांना इशारा देत, “तुम्ही आमदार विक्रम पाचपुते आणि त्यांचे बंधू प्रताप पाचपुते यांचे खाजगी नोकर नाही आहात, हे ध्यानात ठेवा,अशा शब्दांत सुनावले. या मोर्चात राज्य बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब नाहटा, नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, स्मितल वाबळे,राजेंद्र म्हस्के, प्रशांत दरेकर, अनिल ठवाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरिदास आबा शिर्के, छाया भोसले यांचीही भाषणे झाली. या मोर्चानंतर नागवडे कारखान्याचे संचालक राकेश पाचपुते, आदेश नागवडे, कृष्णा नागवडे, प्रमोद म्हस्के, खंडू पवार, प्रवीण शिर्के, मंगेश सूर्यवंशी यांच्यासह हजारो महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी आ. जगताप म्हणाले, जनतेच्या करातून मिळणाऱ्या पैशातून तुमचे पगार होतात, त्यामुळे अधिकाऱ्यांनी शासनाचे नोकर म्हणून नियमानुसार काम करावे. पाचपुते यांच्या दबावाखाली किंवा त्यांच्या आदेशानुसार काम करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही. नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनीही संताप व्यक्त केला. दोन चिमुरड्यांचा बळी गेल्याने शोकाकुल असलेल्या ग्रामस्थांनी भावनेच्या भरात केलेल्या आंदोलनावर प्रशासनाने गुन्हे दाखल करणे दुर्दैवी आहे. दोषी डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शैला डांगे आणि पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस यांनी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला. ठेंगे रुजू झाल्यापासून तालुक्यात जणू इंग्रजी राजवट सुरू असून अवैध धंद्यांमध्ये आमदार विक्रम पाचपुते यांचे बंधू प्रताप पाचपुते यांच्या पंटरची भागीदारी असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. हिंमत असेल तर समोर यावे, कुठेकुठे गुटखा, दारू, मटका व जुगार अड्डे सुरू आहेत, ते आपण स्वतः दाखवतो, असे आव्हान त्यांनी दिले. प्रशासनाला घेराव; अधिकाऱ्यांची उडाली धावपळ आंदोलन सुरू असताना एकाही प्रशासकीय अधिकाऱ्याने भेट न दिल्याने संतप्त राजेंद्र म्हस्के यांनी आक्रमक भूमिका घेत, जर अर्ध्या तासात अधिकारी येथे आले नाहीत, तर सर्व शासकीय कार्यालय बंद पाडले जातील, असा इशारा दिला. या इशाऱ्यानंतर काही मिनिटांतच पोलिस उपविभागीय अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर, तहसीलदार सचिन डोंगरे आणि गटविकास अधिकारी राणी फराटे हे अधिकारी आंदोलनस्थळी आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *