Headlines

मोदी-शहा 2029 मध्ये सत्तेत नसणार, 'मोदी तो गयो'- राऊत:म्हणाले- विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी




उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप, केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली. तसेच, देशात आणि राज्यात होणाऱ्या पेपरफुटीमागे भाजपचेच लोक असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. यावेळी राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राऊत यांनी, ‘२०२९ मध्ये मोदी-शहा सत्तेत नसणार, मोदी तो गयो’, असा दावा करत भाजप नेत्यांवर सडकून टीका केली. “पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी” विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली. “जंतरमंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर जो लाठीमार आणि अत्याचार झाला, त्याची जबाबदारी कोण घेणार? या संपूर्ण प्रकाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची जाहीर माफी मागितली पाहिजे,” अशी आक्रमक मागणी राऊत यांनी केली. “पेपर फोडणारे भाजपचेच लोक” राज्यातील आणि देशातील पेपरफुटीच्या घटनांवर राऊतांनी तीव्र संताप व्यक्त केला. “आज मी पाहिले की पुन्हा पेपर फुटले आहेत. हे सर्व पेपर फोडणारे लोक भाजपचेच आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही हे मान्य करावे की राज्यात पेपर फुटत आहेत. महाराष्ट्र कधीकाळी शिक्षणाच्या बाबतीत एक प्रतिष्ठित राज्य म्हणून ओळखले जायचे, पण आता या राज्याची पातळी अत्यंत घसरली आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ‘मोदी तो गयो…’ २०२९ बाबत मोठा दावा विविध पक्षांचे नेते सध्या पंतप्रधान मोदींची भेट घेत असल्याबाबत विचारले असता राऊत म्हणाले, “ते देशाचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे राजकारणी लोक त्यांना जाऊन भेटणारच. पण, मोदी आणि अमित शहा २०२९ ला सत्तेत राहणार नाहीत. मोदी तो गयो…” असे म्हणत त्यांनी भाजपच्या भविष्यावर राजकीय टीकास्त्र सोडले. तसेच मोदींच्या इन्स्टाग्राम व्हिडिओवरही राऊतांनी निशाणा साधला. “लोक तो व्हिडिओ जास्त पाहत नाहीत, उलट त्यावर टीकाच जास्त करत आहेत,” असे ते म्हणाले. शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही! राज्यातील राजकीय समीकरणांवर बोलताना संजय राऊत यांनी शरद पवार गटाची भूमिका स्पष्ट केली. “शरद पवार आणि सुप्रिया सुळे ज्या पक्षाचे नेतृत्व करतात, तोच राष्ट्रवादीचा ‘ओरिजनल’ पक्ष आहे. हा पक्ष भविष्यात कधीही भाजपकडे जाणार नाही,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. धर्मेंद्र प्रधान आणि प्लास्टिकच्या नोटांवरून टोला NDA च्या बैठकीत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या झालेल्या कौतुकावर राऊतांनी खोचक टीका केली. “धर्मेंद्र प्रधान काय हुतात्मा आहेत का? त्यांनी देशासाठी काय बलिदान दिले आहे का? काही दिवस भाजप त्यांचे उदोउदो करेल,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच, प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याच्या चर्चेवरही त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. “मोदींनी परदेशात जाऊन काही नव्या गोष्टी पाहिल्या असतील, म्हणूनच ते आता प्लास्टिकच्या नोटा बाजारात आणत आहेत. पण लिहून ठेवा, या नोटाही काही दिवसांतच बंद पडतील,” अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *