Headlines

घरासमोर खेळणाऱ्या तीन वर्षीय बालकावर पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने केला हल्ला:बागरोजा हडको परिसरातील हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद



शहरातील मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बागरोजा परिसरातील जुन्या साताळकर हॉस्पिटल परिसरात घरासमोर खेळणाऱ्या एका तीन वर्षीय बालकावर मोकाट कुत्र्याने मंगळवारी दुपारी हल्ला केला. मुलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्याच्या आईन

.

बागरोजा परिसरातील एक तीन वर्षीय मुलगा घरासमोर खेळत असताना मोकाट कुत्र्याने पाठीमागून त्याच्यावर झडप घालून हल्ला केला. यात बालकाच्या खांद्याला जखम झाली आहे. ओरडण्याचा आवाज ऐकून धावत आलेल्या त्याच्या आईने कुत्र्याच्या तावडीतून त्याची सुटका केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेचे कुत्रे पकडणारे पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले. सुमारे दोन तास पथक कुत्र्याचा शोध घेत होते. मात्र, परिसरातील संतप्त नागरिकांनी घटनेनंतर या मोकाट कुत्र्याला मारून टाकल्याचे समोर आले. मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.

^ मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आणखी एक वाहन व काही कर्मचारी वाढवण्यात आले आहेत. सध्या दोन वाहने व कर्मचाऱ्यांकडून सकाळी व रात्री अशा दोन शिफ्टमध्ये कुत्रे पकडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. – यशवंत डांगे, आयुक्त, महापालिका

जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात टिळक रस्त्यावर एका पिसाळलेल्या कुत्र्याने अवघ्या पाच ते सहा तासात सुमारे ३८ नागरिकांवर हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतरही मोकाट कुत्र्याच्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत. गुलमोहर रस्त्यावर महापौरांच्याच प्रभागात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे. महापौरांनी सूचना देऊनही यावर कारवाई झालेली नाही. आता बालिकाश्रम रस्त्यावरील बागरोजा परिसरात पुन्हा घटना घडली आहे.

शहरात सुमारे २५ हजार मोकाट कुत्री असल्याचे प्रशासनाकडून वेळोवेळी सांगितले जाते. या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी विशेष मोहीम राबवण्याची मागणीही झाली. मात्र, कुत्री पकडल्यानंतर व निर्बीजीकरण केल्यानंतर त्यांना ठेवण्यासाठी मोठे डॉग शेल्टर आवश्यक आहे. सध्या पिंपळगाव माळवी येथे एवढ्या मोठ्या क्षमतेचे शेल्टर नाही. नवीन शेल्टरचे कामही रखडलेले आहे. त्यामुळे विशेष मोहीम राबवण्यापूर्वी सुमारे एक हजार कुत्री एकावेळी ठेवता येतील एवढे मोठे डॉग शेल्टर उभारण्याचे आव्हान मनपासमोर आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *