![]()
नेवासे तालुक्यातील चांदा-बऱ्हाणपूर रस्त्यालगत बापूसाहेब थिटे यांच्या वस्तीपर्यंत जाणारा शिवपानंद रस्ता प्रशासनाच्या पुढाकाराने आणि शेतकऱ्यांच्या लोकसहभागातून अखेर खुला करण्यात आला. अंदाजे दोन ते अडीच किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावरील वेड्या बाभळींसह
.
अतिक्रमणामुळे या रस्त्यावरून दुचाकीने किंवा पायी जाणेही कठीण झाले होते. विशेषतः पावसाळ्यात शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी स्वाक्षरी मोहीम राबवून वरिष्ठ मंडल अधिकारी व संबंधित प्रशासनाकडे निवेदने दिली होती. त्याची दखल घेत प्रशासनाने नियोजनबद्ध कार्यवाही करत तीन जेसीबी आणि दोन ट्रॅक्टरच्या साहाय्याने दोन दिवसांत अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा केला.
या कामासाठी परिसरातील १२ शेतकऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. शेतकऱ्यांनी एकजुटीने सहकार्य केल्यामुळे रस्त्याचे काम विनावाद पूर्ण झाले. आता या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठीही प्रयत्न सुरू करण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ही कारवाई तहसीलदार संजय बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी अमृता पडोळे, ग्राम महसूल अधिकारी संदीप बोरुडे यांनी पार पाडली. यावेळी चांदा गावचे सरपंच रावसाहेब दहातोंडे उपस्थित होते. सोनई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
रस्ता खुला करण्यापूर्वी प्रशासनाने संपूर्ण मार्गाची पाहणी करून आजूबाजूच्या शेतकऱ्यांशी अतिक्रमणाबाबत चर्चा केली. चर्चेनंतर सर्वांनी लोकसहभागातून आणि कोणताही वाद न घालता अतिक्रमण स्वेच्छेने हटविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोणताही तणाव न निर्माण होता अनेक वर्षांपासून रखडलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला.