![]()
राहुरी शहराचे ग्रामदैवत श्री बुवासिद्ध देव यांच्या यात्रा उत्सवाला बुधवारपासून (२९ जुलै) प्रारंभ होत असताना मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या एका फलकामुळे शहरात वादाचे वातावरण निर्माण झाले आहे. फलकावर वक्फ न्यायाधिकरणाच्या आदेशाचा उल्लेख करत मंदिर परिसरात ध्वज लावणे, आरती करणे, घोषणाबाजी करणे, धार्मिक विधी करण्यास मनाई असल्याचा मजकूर नमूद केला आहे. या फलकाला ग्रामस्थांनी विरोध दर्शवत प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, श्री बुवासिद्ध देवस्थान हे शेकडो वर्षांपासून हिंदू समाजाचे श्रद्धास्थान आहे. येथे इ.स. १८०० पासून पूजा-अर्चा, महाआरती आणि यात्रा उत्सवाची परंपरा सुरू आहे. यात्रेला अवघा एक दिवस असताना असा फलक लावून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शहरातील शांतता व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत संबंधित फलक हटविणे, यात्रा निर्विघ्न पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे आणि संबंधित आदेशाबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस उपअधीक्षक (श्रीरामपूर) आणि राहुरी पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे. निवेदनावर उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, नगरसेवक प्रतीक तनपुरे, भाजपा मंडल अध्यक्ष राहुरी तालुका विक्रम भुजाडी, नगरसेविका प्रियंका काशिद , नगरसेविका सिंधू डावखर स्वीकृत नगरसेवक. ॲड. राहुल शेटे, महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे, श्री संत सावता महाराज मंदीर ट्रस्ट, राहुरी , मंळगंगा तरुण मंडळ , व्यंकटेश तरुण मंडळ, मित्र मंडळ, श्रीरामदत्त तरुण मंडळ, सकल वाल्मिकी समाज, श्रीकृष्ण मित्र मंडळ,जय बजरंग तरुण मंडळ यांच्या सह्या आहेत. या आहेत राहुरीतील नागिरकांच्या प्रमुख मागण्या { मंदिर परिसरातील वादग्रस्त फलक तातडीने हटवावा. { यात्रा उत्सव निर्विघ्न आणि शांततेत पार पडावा. { संबंधित आदेशाची शासन स्तरावर फेरतपासणी करून योग्य निर्णय घ्यावा. { कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करावा.
Source link
यात्रेच्या तोंडावर बुवासिद्ध देवस्थानावर वाद:फलकावरून राहुरीमध्ये संताप, वक्फ न्यायाधिकरणाच्या आदेशाचा उल्लेख असलेल्या फलकाला विरोध