![]()
जंतर-मंतर आंदोलनानंतर आता कॉक्रोच जनता पार्टी पुढील राजकीय आणि संघटनात्मक दिशा निश्चित करण्याच्या तयारीत आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आज दुसऱ्या दिवशीही पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक होत असून, देशभरातील आंदोलनांची रणनीती, संघटन विस्तार आणि विविध राष्ट्रीय प्रश्नांवर पुढील भूमिका याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर येथे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आज दुसऱ्या दिवशीही सुरू असणार आहे. जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर संघटनेची पुढील दिशा काय असावी, देशभरात संघटन कसे वाढवायचे, तसेच विविध राज्यांमध्ये जनआंदोलने उभारण्यासाठी कोणती रणनीती आखायची, यावर बैठकीत सविस्तर चर्चा होत असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. विविध राज्यांतील विद्यार्थी आंदोलनांना पाठिंबा, या मुद्यांवरही चर्चा बैठकीत इंधन दरवाढ, बेरोजगारी, आर्थिक संकट, शिक्षण व्यवस्था, नीट परीक्षेचा प्रश्न तसेच विविध राज्यांतील विद्यार्थी आंदोलनांना पाठिंबा या मुद्यांवरही चर्चा सुरू असल्याचे समजते. संघटनात्मक रचना अधिक मजबूत करण्याबरोबरच आगामी काळात विविध सामाजिक आणि राष्ट्रीय प्रश्नांवर देशव्यापी भूमिका घेण्याबाबतही विचारमंथन सुरू आहे. निवडणूक लढवण्याऐवजी दबावगट म्हणून काम करण्यावर भर यापूर्वी पक्षाने स्पष्ट केले होते की, CJP सध्या राजकीय पक्ष म्हणून निवडणूक लढवण्याऐवजी दबावगट म्हणून काम करण्यावर भर देणार आहे. न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, माध्यमे आणि लोकशाही संस्थांवरील विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याची पक्षाची भूमिका असल्याचेही बैठकीत पुन्हा अधोरेखित होण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी देशभरातून पक्षाचे पदाधिकारी आणि प्रवक्ते छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. संघटन विस्ताराचा रोडमॅप, आगामी आंदोलनांचे नियोजन आणि विविध राज्यांतील कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करण्यासाठी स्वतंत्र सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, आज दुपारी सुमारे २ वाजता अभिजित दिपके पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील निर्णय, पुढील कार्यक्रम आणि संघटनेची अधिकृत भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळासह CJP समर्थकांचे लक्ष लागले आहे. काल ‘सर्वच संस्थांवरून जनतेचा विश्वास उडालाय’ दरम्यान, काल अभिजीत दीपके पत्रकार परिषद घेतली. यामध्ये जंतर-मंतरवरील आंदोलनाला मिळालेला पाठिंबा केवळ शिक्षण व्यवस्थेपुरता मर्यादित नव्हता, असे दीपके यांनी स्पष्ट केले. “सध्या देशातील राजकीय व्यवस्था, न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे, शिक्षण व्यवस्था आणि निवडणूक आयोग यांसारख्या सर्वच महत्त्वाच्या संस्थांवरून जनतेचा विश्वास उडाला आहे. लोकांच्या मनात असलेला हा राग जंतर-मंतर, बंगाल, मुंबई आणि चेन्नईसह देशभरात दिसून आला.” राजकीय पक्ष नाही, ‘प्रेशर ग्रुप’ म्हणून काम करणार सीजेपी राजकीय पक्ष स्थापन करणार का? या प्रश्नावर दीपके यांनी स्पष्ट केले की, “देशाला सध्या आणखी एका राजकीय पक्षाची गरज नसून एका भक्कम ‘दबावगटाची’ गरज आहे. आम्ही राजकीय पक्ष स्थापन करणार नाही, तर प्रेशर ग्रुप म्हणूनच यापुढे काम करू.” दोन दिवसांच्या या ‘कॉकरोच कॉन्क्लेव्ह’मध्ये देशभरात संघटना कशी वाढवावी, याचा रोडमॅप तयार केला जाईल. तसेच, ई-२० (E20) इंधन, बेरोजगारी आणि देशातील आर्थिक संकट यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
36 दिवसांचा लढा आणि मंत्र्यांचा राजीनामा भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या एका टिप्पणीवर केलेल्या उपरोधिक पोस्टनंतर अभिजीत दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली होती. अमेरिकेतून भारतात परतलेल्या दिपके यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी जंतर-मंतरवर सलग 36 दिवस मोठे आंदोलन उभे केले. या आंदोलनाला देशभरातून विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व पाठिंबा मिळाला. देशातील बलाढ्य विरोधी पक्ष जे करू शकले नाहीत, ते या तरुणांनी करून दाखवले. विद्यार्थ्यांच्या वाढत्या दबावासमोर झुकून अखेर 25 जुलै रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या ऐतिहासिक यशानंतर अभिजीत दिपके आपल्या मूळ गावी, छत्रपती संभाजीनगरमध्ये परतले असून, उपचार घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे जंगी स्वागत केले. भाजपकडून ऑफर? काही दिवसांपूर्वीच अभिजीत दिपके यांनी एक मोठा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. आपल्याला भाजपमध्ये सामील होण्याची ऑफर मिळाली होती, असे त्यांनी म्हटले होते. मात्र, भाजपने त्यांचा हा दावा फेटाळून लावला होता. आता पहिल्याच आंदोलनात यश मिळवलेली कॉकरोच जनता पार्टी आगामी काळात व्यवस्थेला कसे धक्के देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. संबंधित बातम्या वाचा.. कॉन्क्लेव्ह:सीजेपीचे पदाधिकारी इकॉनॉमी क्लासने आले; रूम शेअरिंग करत हॉटेलमध्ये स्टे, ‘दिव्य मराठी’ने केलेल्या तपासणीत सर्व काही साधारण कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीची ‘कॉक्रोच कॉन्क्लेव्ह’ शहरातील अभिजित दिपके यांच्या घरी पार पडत आहे. या बैठकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सीजेपीच्या खर्चाचा मुद्दा समोर आला आहे. यात ‘दिव्य मराठी’ने केलेल्या तपासणीत सर्व काही साधारण असल्याचे समोर आले आहे. पार्टीचे भविष्य ठरवण्यासाठी असलेल्या या बैठकीसाठी पार्टीचे प्रवक्ते व अन्य पदाधिकारी बुधवारी सायंकाळी दोन वेगळ्या विमानाने शहरात आले आहेत. त्यामुळे त्यांचा प्रवास व हॉटेलातील स्टे यावर अनेकांचे लक्ष लागले होते. सविस्तर वाचा सीजेपीच्या बैठकीत दिपकेंच्या वडिलांनाही प्रवेश नाही:राजकीय पक्ष नव्हे, तर दबावगट करणार, छत्रपती संभाजीनगरात बैठकीत पक्षाची दिशा ठरली देशातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सीजेपी (कॉक्रोच जनता पार्टी) राजकीय पक्ष स्थापन करणार नाही. त्याऐवजी दबावगट म्हणून काम करणार, असे सीजेपीतर्फे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. न्यायव्यवस्था, मीडिया आणि निवडणूक आयोग यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांवरील लोकांचा विश्वास उडाल्याचे जंतर-मंतर, बंगाल, मुंबई आणि चेन्नईसह देशभरात स्पष्टपणे दिसून आले आहे. त्यामुळे संस्थांमधील नि:पक्षता आणि उत्तरदायित्व पुनरुज्जीवित करण्यासाठी देशव्यापी चळवळ उभारणार, असेही सांगण्यात आले. सविस्तर वाचा
Source link
जंतर-मंतर आंदोलनानंतर CJPची आज निर्णायक बैठक:पुढील रणनीती, संघटन विस्तार, देशव्यापी आंदोलनाच्या आराखड्यावर मंथन: दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद