![]()
कळमनुरी येथे महिलेच्या गळ्यातील दागिने पळविल्याची घटना घडली, मात्र भरधाव वेगाने जाणाऱ्या चोरट्यांच्या दुचाकीला अपघात झाल्याने चोरटे पोलिसांच्या हाती लागले. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात बुधवारी ता. 5 रात्री गुन्हा दाखल झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या दोघांवर हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी शहरातील मारवाडी गल्लीभागातील संतोषी सारडा ह्या बुधवारी ता. 5 रात्री भोजन करून शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्या एचडीएफसी बँक ते सोमाणी सुपर शॉपी जवळील मार्गावरून जात असतांना एका दुचाकीवर आलेल्या दोघांनी अचानक त्यांच्या समोर येऊन दुचाकी थांबवली. काही कळण्याच्या आत त्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे शॉर्ट गंठण ओढून पळ काढला. दरम्यान,या घटनेमुळे घाबरलेल्या संतोषी सारडा यांनी आरडा ओरड केली. मात्र तो पर्यंत चोरटे पसार झाले होते. त्यानंतर त्यांनी तातडीने कळमनुरी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावेळी त्यांनी चोरट्यांचे वर्णन देखील पोलिसांना सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर काही वेळातच कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावर एका दुचाकीचा अपघात झाल्या्ची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक जमीर नाईक, सहाय्यक पोलिस निरीक्षक रघुनाथ शेवाळे, जमादार पोले, गजानन होळकर, लक्ष्मीकांत माखणे, अफरोज पठाण यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दोन्ही जखमींना उपचारासाठी कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र चोरीच्या घटनेत सांगितलेल्या वर्णनानुसार दोघांचेही चेहरे दिसत असल्याने पोलिसांनी त्यांची चैाकशी करून तपासणी केली असता त्यांच्या जवळ चोरीला गेलेले गंठण सापडले. या प्रकरणी संतोषी सारडा यांच्या तक्रारीवरून कळमनुरी पोलिसांनी विकास वाडे, रामा पठाडे (रा. बेलवाडी, ता. हिंगोली) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक शेवाळे पुढील तपास करीत आहेत.
Source link
हिंगोलीत शतपावली करणाऱ्या महिलेचे गंठण पळवले अन् पुढे…:भरधाव चोरट्यांचा अपघात, पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयातच ठोकल्या बेड्या