Headlines

पंढरीत 15 कुटुंबांचे पुन्हा स्थलांतर, पाणी पातळी आज ओसरेल:व्यास नारायण झोपडपट्टीला पुराचा वेढा, भीमा नदीकाठच्या पिकांमध्ये पाणी गेल्याने नुकसान‎



एका आठवड्यात पंढरपूर शहर आणि तालुक्यातील नदी काठच्या गावावर दुसऱ्या वेळी पूरस्थितीचे ओढवले होते.मात्र बुधवारी सायंकाळीपासून उजनी आणि वीर धरणातील विसर्ग कमी केल्याने पुराचे संकट आणखी एकदा टळले आहे.

.

भीमा आणि नीरा नदीच्या खोऱ्यातील बहुतांश धरणे भरली आहेत. शिवाय उजनी धरण ही १०० टक्के पातळीवर आहे. त्यामुळे भीमा, नीरा खोऱ्यात पाऊस झाल्यानंतर उजनी, वीर धरणातून पाणी सोडावे लागते आहे.

बुधवारी संध्याकाळी पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत १ लाख क्यूसेकचा पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने नदीकाठच्या सखल भागांत पुराचे पाणी शिरले. सुरक्षेचा उपाय म्हणून व्यास नारायण झोपडपट्टीतील १५ कुटुंबांतील ६० लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. या पूरग्रस्तांच्या जेवणाची सोय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

​दरम्यान, उजनी व वीर धरणांतून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्याने आजपासून भीमा नदीची पाणीपातळी ओसरण्यास सुरुवात होणार असून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.​बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता वीर धरणातील विसर्ग ५ हजार क्यूसेकवर आणला गेला, तर सायंकाळी साडेसहा वाजता उजनी धरणातील विसर्ग ५० हजार क्यूसेकपर्यंत कमी करण्यात आला आहे. धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या या नियंत्रणात आणलेल्या पाण्यामुळे पंढरपुरातील पूरस्थिती आता हळूहळू निवळेल.

पाण्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान तालुक्यात पावसाने उघडीप दिलेली असतानाही धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना मात्र पुराचा सामना करावा लागत आहे. पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांची हजारो हेक्टर पिके एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा पाण्याखाली गेली आहेत. तसेच नदीकाठचे शेतीपंप, पाइपलाइन आणि इतर अवजारे हलवावी लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *