![]()
कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी देण्यात आलेले आदेश तात्काळ मागे घ्यावेत आणि झालेली चूक दुरुस्त करावी. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्याची चूक मान्य करावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. सांगली दौऱ्यावर असताना ते बोलत होते. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून ठिकठिकाणी मराठा बांधवांशी संवाद साधून 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘निर्णायक’ आंदोलनाची रणनीती आखत आहेत. या दौऱ्यादरम्यान सांगलीत मीडियाशी बोलताना त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मनोज जरांगे म्हणाले की, मंत्र्यांच्या पत्रावर सांकेतिक भाषा वापरली जाते. पत्रावर ‘अ’ लिहिल्याचा अर्थ या मागणीला प्रथम प्राधान्य देणे असा होतो, हे मला मंत्र्यांच्या पीएस आणि ओएसडीनेच सांगितले आहे. जर सरकार किंवा मंत्री यात हस्तक्षेप करत नाहीत, तर मग या प्रकरणाचा प्रस्ताव तातडीने का मागवण्यात आला? बावनकुळे तुम्ही कितीही स्पष्टीकरणे दिली तरी तुम्ही पूर्णपणे चुकला आहात. तुमची ही चूक तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला संपवून टाकेल. मुख्यमंत्र्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही, असे सांगत मंत्र्याची चूक मान्य करून ती दुरुस्त करावी, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. जात पडताळणी समितीच्या कामकाजात सरकारचा हस्तक्षेप नसतो आणि ती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने काम करते, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. यावर सवाल उपस्थित करत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मग बावनकुळेंना अशा प्रकारे पत्रावर इंडोसमेंट करण्याचे अधिकार न्यायालयाने दिले आहेत का? सरकारमधील मंत्रीच जर हस्तक्षेप करत असतील, तर मग त्यांच्या त्या पत्राचा अर्थ काय? तुम्ही लोकांना किती वेड्यात काढणार आहात? असा सवाल जरांगेंनी केला आहे. तलाठी बदलला की हस्ताक्षर बदलते मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या कुणबी नोंदींमध्ये क्षुल्लक त्रुटी दाखवून त्या रद्द करण्याचा डाव आखला जात आहे. कुठे ‘कुणबा’ लिहिले आहे, कुठे शाईचा किंवा हस्ताक्षराचा बदल आहे, अशी क्षुल्लक कारणे पुढे केली जात आहेत. गावात दरवर्षी तलाठी बदलतात, एकाच गावात 50-50 वर्षे एकच तलाठी राहत नाही. माणूस बदलला की हस्ताक्षर बदलणारच! बावनकुळेंना काही अक्कल आहे की नाही, मला समजत नाही, असे म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे. 29 ऑगस्टपासून कोणतीही गय केली जाणार नाही मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाज सध्या पेटून उठला असून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, अशीच आपली इच्छा आहे. मात्र, सरकारने मराठ्यांचे वाटोळे करण्याचा प्रयत्न केल्यास 29 ऑगस्टपासून कोणतीही गय केली जाणार नाही आणि ताकदीचे आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही जरांगे यांनी शेवटी दिला.
हे ही वृत्त वाचा
शिंदे-फडणवीसांच्या राजकीय वादात मराठा समाजाचा बळी जातोय:सरकारकडून वारंवार फसवणूक, सुषमा अंधारे यांचा आरोप
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या मोठे राजकीय वातावरण तापले असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “सध्याचे महायुती सरकार मराठा समाजाला केवळ आश्वासनांचे गाजर दाखवून त्यांची वारंवार फसवणूक करत आहे,” असा हल्लाबोल अंधारे यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय शह-काटशहाच्या खेळात सर्वसामान्य मराठा समाजाला बळीचा बकरा बनवले जात असल्याचे त्या म्हणाल्या. वाचा सविस्तर
Source link