Headlines

आपेगाव, हिरडपुरी बंधारे तुडुंब; 50 गावांचा पाणी प्रश्न मिटला:हजारो हेक्टर शेतीला मिळणार भक्कम आधार‎, जायकवाडी धरणातील विसर्गाचा फायदा




पैठण जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेला मुसळधार पाऊस आणि वरच्या धरणांमधून झालेली जोरदार आवक यामुळे जायकवाडी धरण सध्या ९३ टक्क्यांहून अधिक भरले आहे. धरणाची सुरक्षितता आणि पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गेल्या सहा दिवसांत धरणाचे दरवाजे उघडून ५ टीएमसीहून अधिक पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले. या सोडलेल्या पाण्याचा थेट व मोठा फायदा पैठण तालुक्यातील आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यांना झाला असून, दोन्ही बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे या बंधाऱ्यांवर अवलंबून असलेल्या ५० हून अधिक गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार विलास भुमरे म्हणाले, बंधारे भरल्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. पाण्याचा जपून वापर केल्यास वर्षभर कोणतीही टंचाई भासणार नाही. जिल्हा परिषद सदस्य पोपट औटे यांनी सांगितले की, आपेगाव व हिरडपुरी बंधारे झाल्यापासून या भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. पाण्याची निरंतर उपलब्धता असल्याने शेतीला मोठे स्थैर्य मिळाले आहे. शेतकरी नेते माऊली मुळे यांनीही बंधाऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन मोठा आर्थिक फायदा होत असल्याचे सांगितले. शेतकरी नेते अप्पासाहेब निर्मळ म्हणाले की, जायकवाडीच्या पाण्यामुळे नदीकाठचे व कालव्याचे शिवार येत्या काळात अधिक हिरवेगार होईल आणि मराठवाड्याच्या कृषी क्षेत्राला आधार मिळेल. जायकवाडी ९३.४९% जायकवाडी धरणातील पाणीसाठा गुरुवारी सकाळी ९३.४९ टक्क्यांवर स्थिर आहे. धरणात २७६७.६५१ दलघमी, तर जिवंत पाणीसाठा २०२९.५४५ दलघमी आहे. २४ तासांत ४१८७ क्युसेक आवक झाली असून, उजव्या कालव्यातून १४०० तर डाव्या कालव्यातून १६०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. जूनपासून आतापर्यंत धरणात १६९७.५१३ दलघमी (५९.९४ टीएमसी) पाण्याची आवक झाली, तर १६३.९२३ दलघमी पाणी कालव्यात सोडले गेले. पाण्याने ऊस लागवडीच्या क्षेत्रामध्ये वाढ होणार हिरडपुरी बंधाऱ्याची जोतापातळी ४२५ मीटर, तर संचय पाणीपातळी ४२९ मीटर आहे. बंधाऱ्याची एकूण साठवण क्षमता ९.६८६ दलघमी असून, सध्या त्यात ४.८०१ दलघमी पाणीसाठा झाला आहे. हा साठा एकूण क्षमतेच्या ४९.५७ टक्के आहे. आपेगाव बंधाऱ्याची जोतापातळी ४२८ मीटर, तर संचय पाणीपातळी ४३२ मीटर आहे. बंधाऱ्याची एकूण साठवण क्षमता ७.१२८ दलघमी असून, सध्या त्यात ५.७१२ दलघमी पाणीसाठा झाला आहे. हा साठा तब्बल ८०.१३ टक्के आहे. जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे आपेगाव येथील बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. परिसरातील शेतशिवारे पुन्हा होणार हिरवीगार आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यांमुळे परिसरातील शेतकरी सधन झाले आहेत. सध्या दोन्ही बंधाऱ्यांत समाधानकारक साठा असल्याने हा पट्टा दुष्काळमुक्त राहण्यास मदत होईल, असे मत अभियंता मंगेश शेलार यांनी व्यक्त केले. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश हासे म्हणाले, बंधारे भरल्याने शेतीला मुबलक पाणी उपलब्ध होईल. मात्र शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व नियोजित वापर करावा. उन्हाळी पिकांना पाणी कमी पडणार नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *