![]()
शहरातील छावणी परिसरात वसलेले कर्णपुरा देवी मंदिर संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. नवरात्रोत्सवात येथे दूरदूरवरून भाविक दर्शनासाठी येतात. वर्षानुवर्षे सुरू असलेली दर्शनाची परंपरा, देवीविषयीच्या आख्यायिका आणि मंदिराशी जोडलेला ऐतिहासिक वारसा यांमुळे कर्णपुरा हे केवळ श्रद्धास्थान न राहता शहराच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग बनले आहे. या मंदिराचा इतिहास नेमका काय आहे? कर्णिका मातेची आख्यायिका काय सांगते? तसेच संभाजीनगरच्या जनमानसात या देवीला ग्रामदेवतेचे स्थान कसे मिळाले? जाणून घेऊया या स्पेशल स्टोरीतून… राजा कर्णसिंग यांच्या वास्तव्यामुळे परिसराला कर्णपुरा नाव इसवी सन 1835 च्या सुमारास राजस्थानातील राजा कर्णसिंग हे छत्रपती संभाजीनगर परिसरात वास्तव्यास आले होते. ते कर्णिका मातेचे भक्त असल्याने त्यांनी येथे देवीचे मंदिर उभारल्याचे उल्लेख आढळतात. राजा कर्णसिंग यांचे या परिसरात साधारण 20 ते 25 वर्षे वास्तव्य होते, असे सांगितले जाते. त्यांच्या वास्तव्यामुळे या परिसराला कर्णपुरा हे नाव पडल्याची माहिती दिली जाते. त्यानंतर मंदिराची जबाबदारी दानवे कुटुंबाकडे सोपवण्यात आली. कालांतराने मंदिराचा जीर्णोद्धारही करण्यात आला. काळ्या पाषाणातील देवीची मूर्ती; मंदिरातील कलाकुसर लक्षवेधी तुळजाभवानीचे स्वरूप मानल्या जाणाऱ्या कर्णिका मातेच्या मंदिरात प्रवेश करताच भव्य सभामंडप नजरेस पडतो. सभामंडपाच्या डाव्या बाजूला देवीचा गाभारा आहे. या गाभाऱ्यात काळ्या पाषाणात घडवलेली देवीची मूर्ती विराजमान आहे. मुकुट, वस्त्र आणि विविध आभूषणांनी सजलेले देवीचे रूप भाविकांचे लक्ष वेधून घेते. देवीच्या मूर्तीमागील प्रभावळीवर आकर्षक कलाकुसर करण्यात आली आहे. मखराच्या मध्यभागी कीर्तिमुख, तर वरच्या बाजूला एका कोपऱ्यात चंद्र आणि दुसऱ्या कोपऱ्यात सूर्याच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळील खांबांच्या वरच्या भागात सरस्वती आणि धनलक्ष्मी यांच्या मूर्तीही पाहायला मिळतात. मंदिरातील या कलाकुसरीमुळे त्याच्या धार्मिक आणि कलात्मक वैशिष्ट्यांची ओळख होते. मंदिरात एका पाळण्यात शयनगादी ठेवलेली आहे. रात्री देवी येथे विश्रांती घेते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे मंदिरातील धार्मिक परंपरांमध्ये या स्थानालाही विशेष महत्त्व आहे. मंदिर समितीमधील आकाश दानवे सांगतात, ‘हे मंदिर 400 वर्ष जुनं आहे. 1983 या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. दरवषी नवरात्रात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. दूरदूरवरून लोक येथे येतात. उत्सवाचे नऊ दिवस येथे विविध कार्यक्रम घेतले जातात. तसेच 8 व्या माळीला होम हवन, दशमीच्या दिवशी मंदिरातील रथ काढून त्याचे सीमोल्लंघन केले जाते. तसेच येथे देवीची यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असल्यामुळे प्रशासनाकडून त्याची काळजीही घेतली जाते.’ नवरात्रोत्सवात भरते भव्य यात्रा उत्सवाच्या काळात कर्णपुरा देवी मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते. या यात्रेत लहान-मोठे पाळणे, विविध मनोरंजनाची साधने आणि खरेदीसाठी अनेक स्टॉल्स उभारले जातात. खाद्यपदार्थांपासून ते विविध वस्तूंच्या दुकानांपर्यंत अनेक पर्याय येथे उपलब्ध असतात. रात्रीच्या वेळी आकर्षक विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण परिसर उजळून निघतो. यात्रेतील पाळणे, स्टॉल्स आणि रोषणाईचा आनंद घेण्यासाठी शहरातील नागरिकांसह आसपासच्या भागांतूनही मोठ्या संख्येने लोक येतात. त्यामुळे नवरात्रोत्सवात कर्णपुरा परिसराला यात्रेचं स्वरूप प्राप्त होतं. देवीच्या दर्शनासोबतच या यात्रेचा आनंद घेणं हा अनेक कुटुंबांसाठी उत्सवाचा अविभाज्य भाग बनला आहे. नवरात्रोत्सवात धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रम कर्णपुरा देवीला कर्णिका माता असेही म्हटले जाते. देवीला तुळजाभवानीचे स्वरूप मानले जात असल्याने भाविकांमध्ये या मंदिराविषयी विशेष श्रद्धा आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिरात विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. भजन, कीर्तन आणि गोंधळ यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांसोबतच आरोग्य तपासणी शिबिरे आणि रक्तदान शिबिरांचे आयोजनही केले जाते. या उपक्रमांमुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत आरोग्य तपासणीची सुविधा मिळते, तर रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून सामाजिक कार्यालाही हातभार लागतो. नवरात्रोत्सवात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने प्रशासनाकडून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येतो. तसेच आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी रुग्णवाहिकेची सुविधाही उपलब्ध ठेवली जाते. श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम असलेले कर्णपुरा देवी मंदिर नवरात्रोत्सवाच्या काळात विशेष गजबजून जाते. त्यामुळे हे मंदिर संभाजीनगरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनातील एक महत्त्वाचे श्रद्धास्थान ठरते.
Source link
कुर्णपुरेचा उदो उदो::राजस्थानचा राजा कर्णसिंगांनी उभारले देवीचे मंदिर, काळ्या पाषाणातली मूर्ती; जाणून घ्या संभाजीनगरच्या ग्रामदेवतेचा 400 वर्षांचा इतिहास