Headlines

5 वर्षांत 36 हजार कंपन्या बंद:आता चाकणमधून 20 कंपन्यांचे स्थलांतर; उद्योगांच्या दुरवस्थेवरून शरद पवारांचा सरकारवर घणाघात




पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतील तब्बल २० कंपन्यांनी मूलभूत सुविधांच्या अभावामुळे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याची बाब समोर आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर चिंता व्यक्त करत जोरदार निशाणा साधला आहे. “पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचे स्थलांतर होणे किंवा ते बंद पडणे हे महाराष्ट्रासाठी निश्चितच भूषणावह नाही,” अशा शब्दांत पवारांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत. २,००० हून अधिक कामगारांच्या रोजगारावर टांगती तलवार शरद पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज आणि रस्त्यांची दुरवस्था यांसारख्या गंभीर समस्यांमुळे चाकणमधील तब्बल २० कंपन्यांनी स्थलांतराचा निर्णय घेतला आहे. या कंपन्यांमध्ये सुमारे २,००० हून अधिक कामगार काम करत असून, त्यांच्या रोजगारावर आता संकट ओढवले आहे. हे उद्योग स्थलांतरित होऊ नयेत आणि राज्याची औद्योगिक ताकद कायम राहावी, यासाठी सरकारने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ५ वर्षांत ३६,२११ कंपन्या बंद; पवारांनी वेधले संसदेतील उत्तराकडे लक्ष केवळ चाकणचाच मुद्दा नव्हे, तर शरद पवारांनी राज्यातील एकूण औद्योगिक स्थितीवरही बोट ठेवले. नुकत्याच झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात खासदार राजाभाऊ वाजे यांनी विचारलेल्या प्रश्नाचा दाखला त्यांनी दिला. केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल ३६,२११ खासगी कंपन्या बंद पडल्या आहेत. मात्र, या कंपन्या बंद झाल्यानंतर किती कामगारांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्यांना पुरेसा मोबदला मिळाला का? याची कोणतीही माहिती सरकारकडे उपलब्ध नसणे, ही अत्यंत धक्कादायक बाब असल्याचे पवार म्हणाले. ‘यशवंतराव चव्हाणांचा वारसा टिकवावा’ महाराष्ट्र हे नेहमीच उद्योगस्नेही राज्य राहिले आहे, याची आठवण करून देत शरद पवार यांनी राज्यकर्त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. “सरकार कोणत्याही विचारांचे असो, ‘औद्योगिकदृष्ट्या उन्नत महाराष्ट्र’ हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी आपल्याला दिलेला वारसा राज्यकर्त्यांनी टिकवावा, अशी महाराष्ट्राची अपेक्षा असेल तर त्यात काहीही वावगे नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला आहे. हेही वाचा.. राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग: विदर्भासह अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; पुढील 24 तास महत्त्वाचे, IMD चा यलो अलर्ट राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः विदर्भातील जिल्ह्यांसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या घाटमाथा भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *