![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ॲड. अमोल गव्हाणे (रा. भोसरी, पुणे) यांना पुणे येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. व्ही. चौधरी-इनामदार यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. ॲड. अमोल गव्हाणे यांनी २१ जुलै रोजी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील स्टोरीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोला हार घातलेला असून, त्यासोबत ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ आणि ‘देशाचे वाटोळे करणाऱ्या, लोकशाही मूल्यांचा खून करणाऱ्या निच व नालायक माणसाला भावपूर्ण श्रद्धांजली’ असा मजकूर लिहिला होता. ही स्टोरी फिर्यादी ॲड. बसवराज मल्लिकार्जुन यातवाड (वय ४७ वर्षे, रा. शनिवार पेठ, पुणे) यांनी पाहिली. इन्स्टाग्रामवरील या स्टोरीमुळे सार्वजनिक शांततेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे नमूद करत, ॲड. यातवाड यांनी पुणे सायबर क्राईम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार ॲड. अमोल गव्हाणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ॲड. गव्हाणे यांच्या वतीने ॲड. मिलिंद पवार यांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. युक्तिवाद करताना ॲड. पवार यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, सदर वादग्रस्त स्टोरी ॲड. गव्हाणे यांनी स्वतः तयार करून पोस्ट केलेली नसून, ती अन्य एका इन्स्टाग्राम अकाउंटवरील पोस्ट त्यांनी केवळ शेअर केली होती. तसेच ती पोस्ट काही वेळातच हटविण्यातही आली होती. त्यामुळे अशा प्रकरणात आरोपीची पोलीस कोठडी अथवा अटक करून तपास करण्याची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. तसेच, सदर तक्रार ही राजकीय व वैचारिक मतभेदांच्या पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आल्याचा युक्तिवाद ॲड. पवार यांनी केला. फिर्यादी यांनी यापूर्वीही विशिष्ट विचारधारेविरुद्ध अशाच स्वरूपाच्या तक्रारी दाखल केल्याचे तसेच त्यांचा विशिष्ट राजकीय विचारधारेतील संघटना व पक्षाशी संबंध असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. ॲड. गव्हाणे हे पूर्वी सत्ताधारी पक्षाच्या विचारधारेशी संबंधित काम करीत होते, मात्र वैचारिक मतभेद झाल्यानंतर ते सध्या सरकारच्या विरोधात असणाऱ्या पक्षातून कार्यरत असल्याचेही ॲड. पवार यांच्याकडून नमूद करण्यात आले. त्यामुळे सदर तक्रारीमागे राजकीय वर्चस्वाचा हेतू व सूडबुद्धीने गुन्हा दाखल केला असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.
Source link
मोदींवरील इन्स्टाग्राम पोस्ट प्रकरणी:वकिलाला पुणे न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर