![]()
विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगरचे वानखेडे यांच्या संकल्पनेतून व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी धनगाव (ता. पैठण) एका शेतावर आंबा लागवड तंत्रज्ञान, व्यापार व निर्यात संधी याबाबत कार्यशाळा झाली. कार्यशाळेची सुरुवात आंबा बागेत भेट देऊन करण्यात आली. शेतातील महाराष्ट्र (अंबा) केशरचे १०२८ झाडे व गुजरात केशरच्या ८०० झाडांची प्रत्यक्ष पाहणी, त्यांनी केलेली मशागत, कलमे निवड, लागवड, खत व्यवस्थापन व बहार धरणे आदींविषयी उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी माहिती घेतली. दरम्यान, मोसंबी व सीताफळ बागेचीदेखील माहिती घेण्यात आली. त्यानंतर या कार्यशाळेत वानखेडे यांनी आपली भूमिका मांडताना आंबा, मोसंबी व डाळिंब फळपिकांचे क्लस्टर तयार झाले पाहिजे तसेच याबाबत वेळोवेळो शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाले पाहिजे व अशा कार्यशाळा सतत चालू ठेवल्या पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. आंबा फळपिकाचे तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी अतिशय सूक्ष्म अनुभवातून व अभ्यासातून आलेले महत्त्वाचे मुद्दे विस्ताराने मांडले. शेतकऱ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे प्रत्यक्ष बाग पाहणीदरम्यान आणि मार्गदर्शनात दिली. पंकज गायकवाड यांनी आंबा निर्यात संधी व त्यासाठी आपण विशेष तयारी केली पाहिजे, त्यातील आव्हाने आणि बारकावे अत्यंत साध्या भाषेत मांडले. तसेच शेतकऱ्यांनी आपले प्रत्यक्ष अनुभव, बागेचे केलेले नियोजन आणि व्यापार याविषयी अनुभव कथन केले.
Source link
धनगाव येथे फळबाग शेतीशाळा:शेतकऱ्यांनी आपले प्रत्यक्ष अनुभव, व्यापाराविषयी अनुभव कथन केले