.


स्वातंत्र्य दिनाच्या ८० व्या आणि अमरावती महानगरपालिकेच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष सोहळ्यात शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या माजी महापौरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अमरावतीच्या ४३ वर्षांच्या विकासप्रवासाचा गौरव करत शहराला अधिक स्वच्छ, सुंदर, आधुनिक, पर्यावरणपूरक आणि नागरिकाभिमुख बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. मुंबई येथील ‘फोक ललकार’च्या २५ कलाकारांनी सादर केलेल्या महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीवर आधारित नाट्याविष्काराने कार्यक्रमाला सांस्कृतिक वैभव प्राप्त झाले.
कार्यक्रमाला महापौर श्रीचंद तेजवानी, खा. डॉ. अनिल बोंडे, आ. प्रवीण पोटे पाटील, आ. संजय खोडके, आ. सुलभा खोडके, आ. रवी राणा, महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेते चेतन गावंडे, विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी महानगरपालिकेच्या विकासात विविध कालखंडात योगदान देणाऱ्या माजी महापौरांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दिवंगत प्रभाकर सवालाखे यांच्या परिवारासह विद्या देशपांडे, प्रवीण काशीकर, विलास इंगोले, मिलिंद चिमटे, अशोक डोंगरे, ॲड. किशोर शेळके, वंदना कंगाले, चरणजीतकौर नंदा, संजय नरवणे आणि चेतन गावंडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यमान महापौर श्रीचंद तेजवानी यांचाही सन्मान केला.
यावेळी बोलताना महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी महानगरपालिकेच्या स्थापनेपासूनच्या विकासप्रवासाचा आढावा घेतला.
तसेच आ. खोडके यांनी महानगरपालिकेने माजी महापौरांचा सन्मान आयोजित केल्याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन केले. आ. रवी राणा यांनी महानगरपालिकेच्या ४३ वर्षांच्या वाटचालीचा उल्लेख करत विविध काळात महापौरपद भूषविणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींनी शहरासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. आ. प्रवीण पोटे पाटील यांनी महानगरपालिकेला राज्यातील आदर्श महानगरपालिका बनविण्याचा संकल्प व्यक्त केला.
यावेळी आ. संजय खोडके यांनी माजी महापौरांचा सन्मान म्हणजे शहराच्या इतिहासाचा गौरव असल्याचे सांगितले. खा. डॉ. अनिल बोंडे यांनी महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्याची गरज अधोरेखित केली. आर्थिकदृष्ट्या सक्षम महानगरपालिका नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देऊ शकते, असे सांगत त्यांनी नागरिकांना सुलभ आणि जलद सेवा उपलब्ध करून देण्यावर भर दिला.
महापौर श्रीचंद तेजवानी यांनी माजी महापौरांच्या योगदानाला अभिवादन करत विकासासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी गटनेते नाना आमले, गटनेते डॉ. राजेंद्र तायडे, झोन सभापती स्वाती कुलकर्णी, शहर सुधार समिती सभापती राधा कुरील, महिला व बाल कल्याण समिती सभापती ममता आवारे, शिक्षण समिती सभापती प्रीती रेवणे, सन्माननीय नगरसेवक व नगरसेविका, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर यांच्यासहविविध समित्यांचे सभापती, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
‘फोक’चा नाट्यविष्कार सत्कार सोहळ्यानंतर मुंबई येथील ‘फोक ललकार’च्या २५ कलाकारांनी महाराष्ट्राच्या लोकसंस्कृती, लोककला आणि परंपरांवर आधारित नाट्याविष्कार सादर केला. संगीत, नृत्य आणि नाट्य यांचा सुरेख संगम असलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. लोककला ही समाजाची संस्कृती, परंपरा आणि लोकभावना यांची जिवंत अभिव्यक्ती आहे. या नाट्याविष्कारातून अमरावतीकरांना दर्जेदार सांस्कृतिक अनुभव मिळेल, असा विश्वास आयुक्त डॉ. गोंदावले यांनी व्यक्त केला.महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवणाऱ्या या सादरीकरणाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.