![]()
सध्या सर्वत्र तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईची चर्चा असून, अन्न भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत त्यांचे परवाने थेट निलंबित केले जात आहेत. याच मोहिमेचा भाग म्हणून, अन्नपदार्थांची सुरक्षितता आणि स्वच्छता नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने लोहेगाव येथील ‘हॉटेल चूल मटण’वर नुकतीच कारवाई करत त्यांचा परवाना तात्काळ निलंबित केला आहे. तसेच, जोपर्यंत आवश्यक त्या सुधारणा केल्या जात नाहीत, तोपर्यंत संबंधित हॉटेलने कोणताही अन्न व्यवसाय करू नये, असे सक्त निर्देशही एफडीएने दिले आहेत. राज्यात सध्या अन्नपदार्थांची सुरक्षितता आणि स्वच्छतेची खात्री करण्यासाठी तपासणी मोहीम सुरू असून, या मोहिमेअंतर्गत नगर रोड परिसरातील लोहेगाव (जुना खराडी जकात नाका, खांदवे नगर) येथील ‘हॉटेल चूल मटण’ची नुकतीच तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान संबंधित हॉटेलमध्ये अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या स्वच्छता आणि आरोग्यविषयक निकषांचे पालन होत नसल्याचे, तसेच अन्नसुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत बाबींची पूर्तता केली नसल्याचे उघडकीस आल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पुणे विभागात धडक कारवाई पुणे विभागात 14 ते 17 ऑगस्ट दरम्यान अन्न व औषध प्रशासनाने तीन आस्थापनांची तपासणी केली. या कारवाईत तब्बल 10 लाख 7 हजार 460 रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या गंभीर प्रकरणी तीन आस्थापनांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, सात जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच, यातील दोन आस्थापना सील करण्यात आल्या असून प्रतिबंधित मालाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहनही प्रशासनाकडून जप्त करण्यात आले आहे. मुंबईतही कारवाईचा बडगा; सहा मोठ्या हॉटेल्सचे परवाने निलंबित पुण्यापाठोपाठ मुंबईतील अन्न सुरक्षा विभागाने देखील सहा मोठ्या हॉटेल्सवर कारवाईचा बडगा उगारला आहे. तपासणीदरम्यान या हॉटेल्समध्ये स्वच्छता, अन्नपदार्थांची साठवणूक, तापमान नियंत्रण आणि देखभालीबाबत गंभीर त्रुटी आढळून आल्या. मानवी आरोग्याशी खेळणाऱ्या या हलगर्जीपणामुळे आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफडीएने या सहाही मोठ्या हॉटेल्सचे परवाने तात्काळ निलंबित केले आहेत.
Source link
लोहेगावमधील 'हॉटेल चूल मटण'चा परवाना निलंबित:तुकाराम मुंढेंचा दणका, स्वच्छता नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी FDA ची कारवाई