Headlines

पंढरपूरमध्ये पैठणच्या भाविकांसाठी ‘नाथनगरी’:मंदिर, कँटीन, पार्किंगची मिळणार सुविधा; दोन एकर जागेवर निवासस्थान‎




पंढरपूरच्या पावन भूमीत विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या पैठण तालुक्यातील भाविकांसाठी आता हक्काचे, सुविधायुक्त निवासस्थान उभे राहत आहे. श्री संत एकनाथ महाराज संस्थानच्या नावे उपलब्ध झालेल्या दोन एकर जागेवर पाच मजली भव्य वास्तू उभारण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. खासदार संदिपान भुमरे यांच्या पुढाकारातून आणि आमदार विलास भुमरे यांच्या देखरेखीखाली साकारत असलेल्या या प्रकल्पामुळे पंढरपूरच्या वारीदरम्यान, तसेच वर्षभर दर्शनासाठी जाणाऱ्या पैठणच्या भाविकांची निवासाची अडचण दूर होणार आहे. या प्रस्तावित पाच मजली वास्तूमध्ये भाविकांसाठी अत्यंत प्रशस्त निवास व्यवस्था, मोठे डोम, आधुनिक कॅन्टीन, वाहनांसाठी सुरक्षित पार्किंग, श्री संत एकनाथ महाराजांचे भव्य मंदिर उभारण्यात येत आहे. त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनासोबतच नाथांच्या चरणी नतमस्तक होण्याची अमूल्य संधी भाविकांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. पैठणची संतपरंपरा आणि पंढरपूरचा वारकरी संप्रदाय यांमधील धार्मिक, आध्यात्मिक अनुबंध अधिक दृढ करणारा हा महत्त्वपूर्ण प्रकल्प ठरणार आहे. प्रकल्पाचे बांधकाम सध्या वेगाने प्रगतिपथावर आहे. नुकतीच पैठणचे आमदार तथा नाथ संस्थानचे अध्यक्ष विलास भुमरे यांनी पंढरपूर येथील बांधकामस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी केली. इमारतीचे काम, बांधकामाचा वेग, भाविकांसाठी प्रस्तावित सुविधा, भविष्यातील नियोजन याबाबत त्यांनी संबंधितांकडून सविस्तर माहिती घेतली. Ãपंढरपूरच्या पावन भूमीत उभारली जाणारी ही वास्तू केवळ निवासाची सोय न राहता, पैठणच्या संतपरंपरेचे एक प्रमुख धार्मिक केंद्र म्हणून विकसित होणार आहे. या इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून ही वास्तू सर्व भक्त-भाविकांच्या सेवेसाठी खुली करण्यात येईल. – विलास भुमरे अध्यक्ष, नाथ संस्थान तथा आमदार पंढरपूर येथे दरवर्षी आषाढी, कार्तिकी वारीसह विविध यात्रांच्या काळात राज्यभरातून लाखो भाविक दाखल होतात. या काळात निवासासाठी जागा मिळवताना भाविकांची धावपळ होते. तसेच तात्पुरत्या निवाऱ्याचा आधार घ्यावा लागतो. पैठणच्या भाविकांसाठी नाथ संस्थानच्या माध्यमातून उभारली जाणारी ही नाथनगरी दिलासादायक ठरेल. या पाहणी प्रसंगी नाथ संस्थानचे दादा बारे, शहादेव लोहारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *