![]()
पुण्यातील वाहनांची ओळख असलेली ‘एमएच 12’ ही मालिका कायम राहणार आहे. ही मालिका संपत आल्याने आता ‘एमएच 12 1 ए’ या नव्या मालिकेचा पर्याय समोर आला आहे. देशात प्रथमच वाहनांच्या नंबरप्लेटवरील अक्षरांच्या सिरीजमध्ये अंक आणि अक्षर यांचा एकत्रित वापर केला जाणार आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) सध्या ‘एमएच 12’ अंतर्गत शेवटची ‘झेड झेड’ ही सिरीज सुरू आहे, जी लवकरच संपणार आहे. ही मालिका संपल्यानंतर आरटीओकडे तीन अक्षरी सिरीज सुरू करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नव्हते. त्यामुळे पुणे आरटीओने रस्ते व महामार्ग मंत्रालयाला ‘एमएच 12’ च्या पुढे ‘1 ए’ अशी मालिका सुरू करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. नवीन मालिका सुरू होईपर्यंत, वाहन खरेदी करणाऱ्या पुणेकरांना तात्पुरत्या स्वरूपात ‘एमएच 61’ या आरटीओ कोडने वाहनांचे रजिस्ट्रेशन करून दिले जाईल. सणासुदीच्या काळात वाहन खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. काही काळानंतर, या वाहनांना नव्या ‘एमएच 12 1 ए’ मालिकेत किमान निर्धारित शुल्क आकारून हस्तांतरित करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. सुरुवातीला ‘एमएच 61’ या नव्या क्रमांकाची चर्चा सुरू झाल्याने ‘एमएच 12’ ही पुण्याची ओळख पुसली जाण्याची शंका व्यक्त केली जात होती. ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पुण्याची ही ओळख जपण्यासाठी पाठपुरावा केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यासंदर्भातील मसुदा लवकरच प्रसिद्ध केला जाईल आणि त्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागवण्यात येतील. त्यानंतरच नव्या मालिकेला अधिकृतपणे सुरुवात होण्याची शक्यता आहे.
Source link
'MH 12' पुण्याची ओळख कायम:वाहनांसाठी लवकरच 'अंक-अक्षर' मिश्रित नवी सिरीज