![]()
गणवेश परिधान करून घरातून निघालेल्या, पण शाळेत न पोहोचता पोहण्याच्या मोहात पडलेल्या दोन निष्पाप बालकांचा मुंबईत दुर्दैवी अंत झाला. गोरेगाव पूर्वेतील आरे कॉलनी परिसरात ही घटना घडली असून, तबेल्यातील पाण्याच्या टाकीत बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. झैब पटेल (१५) आणि नकीब पटेल (१३) अशी या दुर्दैवी मृत भावंडांची नावे आहेत. झैब इयत्ता १० वीत तर नकीब ९ वीत शिकत होता. जोगेश्वरी गुंफा इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूलमध्ये शिकणाऱ्या या दोन्ही भावांनी शुक्रवारी शाळेला दांडी मारली होती. प्राप्त माहितीनुसार, नेहमीप्रमाणे शाळेला निघालेल्या दोन्ही भावांनी अचानक आपला मोर्चा आरे कॉलनीतील गौतम नगर, मॉडर्न बेकरी जंक्शनजवळील एका तबेल्याकडे वळवला. तिथे असलेल्या पाण्याच्या टाकीत दोघेही पोहण्यासाठी उतरले. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही गटांगळ्या खाऊ लागले आणि अवघ्या काही मिनिटांतच त्यांचा श्वास गुदमरला. स्थानिक नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात येताच तातडीने अग्निशामक दल, पोलीस आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने दोन्ही मुलांना टाकीतून बाहेर काढून ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ‘शाळेत गेला असता तर माझा बाळ वाचला असता’ या घटनने पटेल कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलांच्या आई-वडिलांचा आक्रोश उपस्थितांचे काळीज चिरणारा होता. ‘शाळेत गेला असता तर आज माझा बाळ वाचला असता’, असा टाहो फोडणाऱ्या पालकांना सांत्वन करणेही कठीण झाले होते. शाळेला मारलेली एक दिवसाची दांडी या निष्पाप चिमुकल्यांच्या आयुष्याची कायमची अखेर करेल, असा विचारही कुणी केला नव्हता. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली.
Source link
हृदयद्रावक:शाळेला दांडी मारून पोहायला गेलेल्या भावंडांचा बुडून मृत्यू, मुंबईच्या आरे कॉलनी परिसरातील घटना