![]()
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर कन्नड शहरालगत रिलायन्स पेट्रोल पंपाजवळील अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा कन्नड ग्रामीण रुग्णालयाच्या कारभारामुळे, वेळेवर रुग्णवाहिका व ऑक्सिजन न मिळाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. गारगोटी (ता. कन्नड) येथील सुभाष मूलचंद राठोड (४०) हे दुचाकीने (एमएच २० ईडब्ल्यू ७२७१) छत्रपती संभाजीनगरकडून कन्नडकडे येत असताना एका ट्रकने अचानक वळण घेतल्याने अपघात झाला. यात राठोड यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना संभाजीनगर येथे हलवण्यासाठी रुग्णवाहिका, ऑक्सिजन सिलिंडर वेळेवर उपलब्ध झाले नाहीत. नातेवाइकांनी खासगी रुग्णालयातून ऑक्सिजन व रुग्णवाहिका मिळवली, रुग्णवाहिकेच्या विलंबामुळे संभाजीनगर येथे नेत असताना त्यांचे निधन झाले. रुग्णालय प्रशासनाने सर्व संबधित आरोप फेटाळले या घटनेवर बोलताना वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध गायकवाड आणि डॉ. दत्ता देगावकर यांनी आरोप फेटाळले आहेत. रुग्णालयात उपचारासाठी भूलतज्ज्ञ डॉ. सुरेंद्र पवार उपस्थित होते. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले. १०८ रुग्णवाहिका गेल्या चार दिवसांपासून नादुरुस्त असल्याने गॅरेजमध्ये होती. तसेच रुग्णालयात जम्बो ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होते, परंतु छोटे वाहतूक योग्य सिलिंडर उपलब्ध नव्हते, असा खुलासा प्रशासनाने केला आहे.
Source link
महामार्गावरील अपघातामध्ये गंभीर जखमी व्यक्तीचा मृत्यू:कन्नड रुग्णालयावर नातेवाइकांचा तीव्र संताप