![]()
वरिष्ठ महिला आंतरजिल्हा फुटबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धेत अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल संघटनेच्या (एडीएफए) वरिष्ठ महिला संघाने विजयी सलामी दिली. सोमवारी झालेल्या सामन्यात अहिल्यानगरने वर्धा जिल्हा संघाचा तब्बल १२-१ गोलने धुव्वा उडवला. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत अहिल्यानगरच्या खेळाडूंनी सामन्यावर पूर्ण वर्चस्व राखले. जळगाव येथे २१ ते २६ ऑगस्टदरम्यान ही स्पर्धा सुरू आहे. वर्धेविरुद्धच्या सामन्यात सुमैय्या शेखने तब्बल ७ गोल करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. तनिषा शिरसुळने ४, तर निकिता रामावतने १ गोल केला. वेगवान पासिंग, अचूक गोलरचना आणि उत्तम सांघिक समन्वयाच्या जोरावर अहिल्यानगरने वर्धेला सुरुवातीपासूनच बचावात्मक खेळ करण्यास भाग पाडले. मागील स्पर्धेत अहिल्यानगर संघाने उपविजेतेपद मिळवले होते. यंदा मात्र केवळ चांगली कामगिरी न करता विजेतेपद पटकावण्याचा निर्धार खेळाडूंनी केला आहे. शिस्त, सातत्यपूर्ण सराव आणि संघभावनेच्या जोरावर पुढील सामन्यांतही विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा संघाचा प्रयत्न राहणार आहे. संघाच्या रवाना होण्यावेळी एडीएफएचे सचिव रोनप फर्नांडिस, समिती सदस्या पल्लवी सैंदाणे, गुलमोहर फुटबॉल क्लबचे सुभाष कानोजिया आणि फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल क्लबचे अभिषेक सोनावणे उपस्थित होते. संघाचे प्रशिक्षक प्रसाद पाटोळे, तर व्यवस्थापक प्रियंका सूर्यवंशी आहेत. प्रशिक्षण शिबिरासाठी गुलमोहर फुटबॉल क्लबने मैदानाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल संघटनेने संघमालक झोएब खान, प्रशिक्षक प्रसाद पाटोळे व सुभाष कनोजिया यांचे आभार मानले. संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, खालिद सय्यद, अमरजीत सिंग शाही यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी संघाचे अभिनंदन केले.
Source link
12 गोल…1 विजय…अन् विजेतेपदाची चाहूल!:अहिल्यानगरच्या महिला फुटबॉल संघाची 12-1 ची दमदार विजयी सलामी